गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. पण त्याहून अधिक चर्चा होते ती या कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या गोंधळाची! गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांकडून हुल्लडबाजीचे, गोंधळ घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यावर पोलिसांची कारवाई, चौकशी, माफीनामा अशा गोष्टी वारंवार घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ असणाऱ्या सिल्लोडमध्ये समोर आला आहे. यामुळे अब्दुल सत्तार इतके संतापले की त्यांनी आक्षेपार्ह भाषेत केलेल्या टिप्पणीवरही आक्षेप येऊ लागले आहेत!
नेमकं घडलं काय?
सिल्लोडमध्ये विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातच नृत्यांगना गौतमी पाटील हिचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बुधवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात अचानक काही प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही प्रेक्षक हुल्लडबाजीही करायला लागले. हा सगळा गोंधळ पाहून आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वत:च माईक हातात घेऊन गोंधळ घालणाऱ्या युवकांना आवरायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर आक्षेपही घेण्यात आले आहेत.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार यांनी यावेळी गोंधळ घालणाऱ्यांना आवरायचे निर्देश पोलिसांना दिले. “पोलीसवाले… पाठीमागच्या लोकांना लाठीचार्ज करा. त्यांना इतकं मारा की त्यांची*** तुटून जाईल. हाणा त्यांना. ए खाली बैस.. सा** तुझ्या बापानं पाहिला होता का कार्यक्रम? तू काय राक्षस आहेस का? माणसाची औलाद आहेस, माणसासारखा कार्यक्रम घ्या”, असं अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली दिलगिरी
दरम्यान, आपण ग्रामीण भाषेतल्या बोलीमध्ये बोलून गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी या प्रकारावर भूमिका मांडली आहे. तसेच, तिथे ६५ हजार जनता होती, त्यात २० हजार महिला व मुलं होती. त्यामुळे ते सुरक्षितपणे घरी पोहोचणं गरजेचं होतं, म्हणून आपण आक्रमकपणे हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओरडलो, असंही ते म्हणाले आहेत.