Abdul Sattar : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड यांनी निवडणुकीत जात, धर्म आणला जातो असं म्हणते जे काही सुरु आहे, कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही अशी स्थित आहे तसंच ते भविष्यासाठी घातक आहे असं म्हणत एक मोठी घोषणा केली आहे. अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सत्तार यांची ही घोषणा चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अब्दुल सत्तार यांची नाराजी

अब्दुल सत्तार यांना यावेळी मंत्रिपद मिळालं नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या ठिकाणी संजय शिरसाटांना संधी देण्यात आली. त्यानंतर अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही रंगल्याचं दिसून आलं.अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या तानाजी सावंत, राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान जालना या ठिकाणी बोलत असताना अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीत जात-धर्म आणला जातो असं सांगत त्यांनी यापुढे निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं आहे.

अब्दुल सत्तार यांची निवडणूक न लढवण्याच घोषणा

अब्दुल सत्तार म्हणाले, “मी सिल्लोडची विधानसभा लढणार नाही. मला जी संधी मिळाली त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या लोकांना विकास नको तर फक्त जातीयवाद पाहिजे. जातीयवादामध्ये माणूसकीही सोडून द्यावी लागते.” यापुढे अब्दुल सत्तार म्हणाले की, “पाच वर्षे सातत्याने १८ तास काम करायचं. पण विधानसभा मतदानाच्या शेवटच्या चार दिवसांमध्ये जातीयवाद, धर्मावर प्रचार सुरू होतो. जात आणि धर्मावर निवडून आलेले लोक हे मरणाऱ्यांना कफनही देणार नाहीत. ते कोणताही निधी आणणार नाहीत. लोकांना लागलेली ही सवय बदलावी लागणार आहे. नाहीतर राजकारणात कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही, कुणीही कुणाला मदत करणार नाही.” असं म्हणत यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली.

हे पण वाचा- Abdul Sattar : एकनाथ शिंदेंची साथ सोडणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “पुढच्या अडीच वर्षांत….”

मी मुलाला सांगितलं आहे की…

सत्तार असंही म्हणाले की, “यावेळी काठावर निवडून आलो. पण सध्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे, ते भविष्यासाठी घातक ठरतं आहे. नगरपरिषदेची निवडणूक ही माझी शेटवची निवडणूक असेल. विधानसभेच्या निवडणुकीत मी उभे राहणार नाही. त्यामुळे कुणी काही माझं वाकडं करू शकत नाही. माझ्या मुलांला सांगितलं की तुला लढायचं असेल तर लढ. मी लढणार नाही. मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होते.” अब्दुल सत्तार यांनी विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही असंच जाहीर केलं आहे. याबाबत काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar announcement that he will not contest next sillod assembly election due to caste and religion issue scj