शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात भाजपाने स्वतःकडे महत्त्वाची खाती ठेवली आणि शिंदे गटाला केवळ झाडी, डोंगर दिल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर आता पत्रकारांनी बंडखोर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. “खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा आणि शिवसेना युतीकडे विरोधक त्यांच्या डोळ्यात लागलेल्या चष्म्याप्रमाणे पाहत आहेत,” असं मत सत्तारांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१५ ऑगस्ट) जालन्यात बोलत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, “भाजपाने शिंदे गटाला झाडी, डोंगर दिला की शेती, उद्योग दिला हे सर्वांसमोर आहे. खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा आणि शिवसेना युतीकडे विरोधक त्यांच्या डोळ्यात लागलेल्या चष्म्याप्रमाणे पाहत आहेत. मात्र, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या माध्यमातून आमच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना गतीमान कारभारातून सोडवण्यासाठी आमचं सरकार काम करेल.”
“एकनाथ शिंदे १८-१८ तास काम करतात”
“एकनाथ शिंदे १८-१८ तास काम करतात. त्यांच्या कामाचं मुल्यमापन केलं पाहिजे. केवळ विरोधाला विरोध करू नये. देवेंद्र फडणवीस हेही १५-१८ तास काम करतात. त्यांनी आता मंत्र्यांवर काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे मंत्र्यांना काम करावं लागेल. या कामाचा ते प्रत्येक महिन्याला, तीन महिन्याला आढावा घेतील. कोणत्या खात्यात काय काम केलं, कशा पद्धतीने काम केलं अशाप्रकारे मंत्र्यांच्या कामाचं मुल्यमापन केलं जाईल,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
“मागील काळात केंद्र व राज्याच्या वादात अनेक कामं अडकली”
“जनतेने ज्या अपेक्षेने ही जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे १८ मंत्री काम करतील. केंद्र व राज्य सरकार सोबत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काळात केंद्र व राज्याच्या वादात अनेक कामं अडकली होती. ती सर्व कामं मार्गी लावण्यासाठीही प्रयत्न केला जाईल,” असंही सत्तारांनी नमूद केलं.