निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. उद्धव ठाकरे गट आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखळा जाणार आहे. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले असून या गटाला अद्याप निवडणूक चिन्ह मिळालेले नाही. या सर्व घडामोडींवर शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या पक्षाला बाळासाहेबांच्या नावाने मान्यता मिळाली आहे. एकनाथ शिंदे हेच असे चिन्ह आहेत की सामान्य माणूस त्यांना हे आमचे मुख्यमंत्री आहेत असे आदराने म्हणतो. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल ते आम्हाला मान्य असेल, असे सत्तार म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या भूमिकेनंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…”
आमच्या हक्काचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले गेले. त्यामुळे कोणते चिन्ह द्यायचे हा निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. लाखो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आगामी काळात आम्हालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल, अशी आशा आहे. आमच्या पक्षाला बाळासाहेबांच्या नावाने मान्यता मिळाली आहे. एकनाथ शिंदे हेच असे चिन्ह आहेत की, सामान्य माणूस आपुलकीने त्यांना हे आमचे मुख्यमंत्री आहेत. हे सामन्यांचे मुख्यमंत्री आहेत असे म्हणतो, असे सत्तार म्हणाले.
हेही वाचा >>> Palghar Mob Lynching Case : महाराष्ट्र सरकार तपास सीबीआयकडे सोपवण्यास तयार
आमच्या बॅनरवर आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) स्वत:च्या नावावर पक्ष काढला आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर किती पक्ष चालतो हे आगामी महापालिका, जिल्हापरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समजेल, असे मत सत्तार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>> Shinde vs Thackeray: ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा, म्हणाल्या “निखारा असलेला…”
उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या निवडणूक चिन्हावरही त्यांनी खोचक भाष्य केले आहे. मशाल हा जो शब्द आहे, त्याला मी विरोध करणार नाही. प्रयत्न सर्वांनीच करावेत. जेव्हा त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री हे महात्त्वाचे पद होते, तेव्हा ते प्रत्येक घरात पहोचू शकले नाहीत. आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर नवीन पक्षासह मशाल हे निवडणूक चिन्ह घेऊन ते घराघरापर्यंत जात आहेत. आपल्याला घरांना आग लावायची नाही, असा खोचक टोला अब्दुल सत्तार यांनी लगावला.