सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ९ आणि शिवसेनेच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच टीईटी घोटाळा प्रकरणात माझ्या मुलींची नावे घेऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ते एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला बोलत होते.
हेही वाचा >>> पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप होऊनही संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान का? एकनाथ शिंदे म्हणाले…
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री जी जबाबदारी देतील ती पार पाडेन. मला दिलेल्या जबाबदारीचा फायदा सामान्य माणूस, गोरगरीब, शेतमजूर यांच्यापर्यंत कसा पोहोचेल याची मी खबरदारी घेईल. आतापर्यंत जे काम केले त्यापेक्षा दुप्पट काम करेन,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.
हेही वाचा >>> वर्षभरापूर्वी संजय राठोडांवर देवेंद्र फडणवीसांनी केली होती टीका; म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांची केविलवाणी स्थिती…!”
“माझी बदनामी करण्यासाठी टीईटी घोटाळा प्रकरण आणले गेले. माझा मुलगा एलएलबी करत आहे. मात्र त्यालादेखील टीईटी पात्रचे प्रमाणपत्र मिळाले, असे सांगितले जात आहे. माझ्या दोन मुली आहेत, त्या अपात्र ठरल्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबला असता तर बदनामी करण्यासाठी आणखी २५ नावे समोर आली असती. कोणालाही अशा पद्धतीने बदनाम करू नये. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ही बदनामी का केली गेली? कारण काय होतं? हे चौकशीत समोर येईल. माझ्या मुलींची लग्नं झालेली आहेत. त्यांना मुलंबाळं आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समोर आणणार आहे,” असा इशाराही सत्तार यांनी दिला.
दरम्यान, राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. मात्र या यादीमध्ये शिंदे गट तसेच भाजपाकडूनही एकही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही.