राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सहाव्या जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे. भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे उमेदवार असलेल्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाने घोडेबाजार करत निवडणूक जिंकल्याचा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे यांची नावे घेतली आहेत. या आरोपांनंतर अपक्ष आमदारांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
मात्र दुसरीकडे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली असा गौप्यस्फोट भाजपाचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी यांनी केला आहे. संतोष दानवे हे जालन्यात माध्यमांशी बोलत होते. अब्दुल सत्तारांनी आम्हाला या राज्यसभा निवडणुकीत भरपूर मदत केली. अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी स्वत: अब्दुल सत्तारांनी खूप प्रयत्न केले. त्याबद्दल मी अब्दुल सत्तारांचे आभार मानतो, अशीच मदत त्यांनी विधान परिषदेलाही करावी असे संतोष दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
“शिवसेना महाविकास आघाडीतील ‘ढ’ टीम असल्याचे पुन्हा सिद्ध”; राज्यसभा निवडणुकीवरुन मनसेचा टोला
“अब्दुल सत्तार ज्या पक्षात आहेत ते कधीच त्या पक्षात नसतात. अपक्ष आमदारांना सोबत घेण्यासाठी सत्तारांनी जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सत्तार हे निश्चितपणे ज्या पक्षात असतात ते कधीच त्या पक्षासोबत नसतात हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे,” असे संतोष दानवे म्हणाले.
“अब्दुल सत्तार यांनी १०० टक्के आम्हाला मदत केली आहे. त्यांचे तोंडच असे आहे की ते बाजारात कोण कुठे गेले आणि कोण कुठे चालले आहे हे बघत फिरत असतात. अशा पद्धतीने आम्हाला माहिती मिळत असते. हीच मदत आम्हाला विधान परिषदेसाठी अपेक्षित आहे आणि तंतोतंत ते याचे पालन करतील,” असेही संतोष दानवे म्हणाले.