अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील,” अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. आता यापुढे हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणायचं का याबाबत राज्याचे नवे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा- शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या….
मुनगंटीवारांच्या निर्णयाला सत्तारांचा पाठिंबा
“हॅलोसद्धा चांगलं आहे. वंदे मातरम् ही चांगलं आहे. गुड मॉर्निंग आणि गुड नाईटही चांगलं आहे, असे म्हणत सत्तारांनी मुनगंटीवारांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर होऊन सांस्कृतिक खात्याची जबाबदारी येताच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुधीर मुनगंटीवारांनी ही घोषणा केली.
हॅलो हा विदेशी शब्द
“वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो हा विदेशी शब्द त्यागत त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम् म्हणत संभाषण सुरू करणार आहोत. १८०० साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करतोय,” असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.