शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. याप्रकरणी सुनावणी संपली असून सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राखीव असताना शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला, तरी आम्ही हसत-खेळत निर्णय मान्य करू. अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांमध्ये मीही आहे, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा- “…तर राष्ट्रवादी काँग्रेसचं आम्ही स्वागत करू”, शिंदे गटाच्या नेत्याची खुली ‘ऑफर’
सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयावर भाष्य करताना अब्दुल सत्तार म्हणाले, “एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत. अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्यांमध्ये मीही आहे, याची मी तुम्हाला आठवण करून देतोय. ज्याला राजकारण करायचं आहे, तो त्याचे ‘प्लॅन’ करत असतो. पण सगळ्याच गोष्टी प्लॅनप्रमाणे घडतात की नाही? हे सांगणं उचित होणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला सर्वांना मान्य असेल.”
हेही वाचा- मोठी अपडेट: सत्तांतराच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीला, चर्चांना उधाण
“शेवटी ते देशाचं सर्वोच्च न्यायालय आहे. आम्ही राहिलो तरी इतिहास लिहिला जाणार आहे, आणि आम्ही गेलो तरी इतिहास लिहिला जाणार आहे. आमची पानं इतिहासात लिहिण्यासारखी असतील. १६ आमदारांबाबत जो निर्णय असेल तो देशासाठी लागू होईल. सुप्रीम कोर्ट हा देशाचा ‘सुप्रिमो’ आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्ही हसत-खेळत मान्य करू…” अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.