राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच सत्तेचे अडीच वर्षे पूर्ण केले आहेत. मात्र अद्यापही तिन्ही पक्षांपमध्ये धुसफूस कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते सर्व काही ठिक असल्याचे कायम सांगत आले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक विधान केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं.
मुख्यमंत्रिपदाबाबत सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, म्हणाल्या “ते मी…”
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर देताना “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावर आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना २५ वर्षानंतर सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदी नंबर लागावा प्रार्थना आहे, असे म्हटले. “महिला मुख्यमंत्री करायच्या असतील तर रश्मी ठाकरे सुसज्ज आहेत. त्यांना राजकारणाचा अभ्यास आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी महाराष्ट्राच्या तमाम मंदिरांमध्ये आधीच पूजा झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २५ वर्षे मुख्यमंत्री पदी राहतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कोणत्या तारखेला होणार याबद्दल मी बोलणं योग्य होणार नाही. २५ वर्षानंतर त्यांचा नंबर लागावा हीच ईश्वरकडे आमची प्रार्थना आहे,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.