मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. रविवारी (२४ जुलै) उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर अनेक आरोप केले. ते (शिंदे गट) माझे वडील तसेच पक्ष चोरायला निघाले आहेत. ते गद्दार नव्हे तर हरमाखोर असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. त्यानंतर आता राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, या शिवसेनेच्या आव्हानाला उत्तर देताना बंडखोर गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी ४२ वर्षांपासून राजकारणात आहे. २५ वर्षांपासून आमदार आणि तीन वेळा मंत्री झालो, असे म्हणत मराठवाड्यातील एकही आमदार पडणार नाही, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा >>> “…तर पहिल्याच निवडणुकीत किती मतांनी जिंकतो हे दाखवणार” उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला अब्दुल सत्तारांचे जशास तसे उत्तर
“येत्या ३१ तारखेला मुख्यमंत्री माझ्या जिल्ह्यात येणार आहेत. सर्व जनता शिंदे यांची वाट पाहत आहे. आमच्या मराठवाड्यात शिंदे यांचा एकही आमदार पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. मी ४२ वर्षांपासून राजकारणात, २५ वर्षांपासून आमदार, तीन वेळा मंत्री झालो. ते एकदाच मुख्यमंत्री झाले आहेत,” असे अब्दुल सत्तार म्हणाले.
हेही वाचा >>> “…तर भाजपाच्या एखाद्या दगडाला शेंदूर लागला असता”, युती फॉर्म्यूला आणि मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक
तसेच नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मनमाडच्या विकासासाठी काहीही केलं नाही. आतापर्यंत ते माझ्या मतदारसंघात आलेले नाहीत, अशी टीका काही दिवसांपूर्वी केली होती. हाच धागा पकडून सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. “आदित्य ठाकरे माझ्या मतदारसंघात कधी आलेच नाही. म्हणूनच माझ्यासारख्या गद्दाराच्या मतदारसंघात या, असं मी त्यांना निमंत्रण देतो. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी आहेत. उद्धव ठाकरेंना शिंदे यांच्या निष्ठेवर शंका आहे. आम्ही आता युतीचा धर्म पाळत आहोत. त्यांनी सर्व दरवाजे बंद केले. एकीकडे नेत्याला बदनाम करायचे आणि दुसरीकडे तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत असे म्हणायचे हे राजकारण नसते,” असे सत्तार म्हणाले.