राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने एकमेकांविरोधात शड्डू ठोकला आहे. शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरे गटातील नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर राज्यातील विकास कामे, पराज्यात चाललेले उद्योग तसेच अन्य मुद्द्यांना घेऊन ठाकरे गट सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका करताना दिसत आहे. आज (२९ ऑक्टोबर) नंदूरबारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही काम झाले नाही, असे म्हणत विद्यामान सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. तर त्याच कार्यक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील रोखठोक भाषण करत ठाकरे गटावर तोंडसुख घेतले. सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना यांना नाव न घेता थेट आव्हान दिले आहे. दोन दिवसांत तुम्ही राजीनामा द्या. मिही देतो. आपला सामना होऊन जाऊद्या, असे सत्तार आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> टाटा एअरबस प्रकल्पावर बोलताना आदित्य ठाकरे आक्रमक, म्हणाले “एका माणसाच्या गद्दारीमुळे…”
“मुख्यमंत्री ज्या ठिकाणी जातात तेथील जनसमुदाय पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतो. आम्ही जवळगावला गेलो, शिल्लोड, मालेगावला गेलो. मात्र अत्यंत कमी वेळात एकनाथ शिंदे यांना भरपूर प्रेम मिळाले. याच कारणामुळे काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठत आहे. नंबर दोनचे पप्पू मला दोन वर्षांनंतर कोण काय आहे आणि कोण बाप आहे, याची माहिती होईल, असे म्हणाले. पण दोन दिवसांत तुम्ही राजीनामा द्या मिही राजीनामा देतो. दोघांचा सामना होऊद्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. अब्दुल सत्तार काय आहे हे सिल्लोडमध्ये समजेल. तर तुम्ही काय आहात हे वरळीमध्ये मुंबईत समजेल,” असे सत्तार आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हणाले.
आम्ही एकूण ५० आमदार आहोत. यामध्ये ४० आमदार शिवसेनेचे आणि दहा अपक्ष आमदार आहेत. शिंदे यांनी आम्हाला सुरतेला नेलं नाही. तर आम्ही ५० लोकांनीच त्यांना विनंती केली. शिवसेना टिकवायची असेल तर तुम्हाला दोन पावले पुढे जावे लागेल, असे आम्हीच त्यांना म्हणालो. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा(बंडखोरीचा) निर्णय घेतला, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.