शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून जुळवून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदेंची राष्ट्रीय नेता म्हणून निवड केल्याचंही अब्दुल सत्तारांनी सांगितलं. अब्दुल सत्तार गुरुवारी (२९ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
अब्दुल सत्तार म्हणाले, “जे जे ठाकरे गटात आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करून शिंदे गटात यावं. आम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली आहे. ते आता राष्ट्रीय नेते आहेत. त्या नेत्याच्या छत्रछायेखाली एका भगव्याखाली यावं.”
“एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनावर चालत आहेत. त्यांचा आशिर्वाद शिंदेंच्या पाठिशी आहे. जे जे बाहेर असतील त्यांनी एकनाथ शिंदेंना नेता म्हणून मान्य करावं. भविष्यातील शिवसेना एकनाथ शिंदेंची असेल आणि त्यांच्याकडेच धनुष्यबाण चिन्ह असेल,” असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं.
पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेण्याचा विचार करणार का?
पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना शिंदे गटात घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “एखाद्या नेत्यामुळे आमच्या दोन्ही पक्षांमध्ये वाद होणार असेल तर नक्कीच तसं होणार नाही. हे भाजपा आणि शिवसेनेचं सरकार आहे. भाजपा आमचा मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाचं कुठंही नुकसान होणार नाही याची एकनाथ शिंदे पूर्ण काळजी घेतात.”
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदेबाबत केलेल्या दाव्यावर सत्तार म्हणाले, “मी स्वतः त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी अर्जून खोतकर शिवसेनेचे आमदार होते. त्यांनाही विचारून घ्या. आम्ही (काँग्रेसने) शिवसेनेला विनंती गेली होती की, आपण आपली सत्ता स्थापन करू. मात्र, आम्ही बोललो तेव्हा एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी काँग्रेसने त्यांना विनंती केली होती की, आपण आपलं सरकार बनवू.”
चंद्रकांत खैरेंच्या आरोपावरही सत्तार यांनी उत्तर दिलं. “ज्यांना गणित कळत नाही, टोटल कळत नाही तेच असे बोलतात. आमच्याकडे १०० लोकं होती. ते १५ घेऊन आले तर सरकार बनलं असतं का? चंद्रकांत खैरेंना साधा अभ्यास करता येत नाही. सरकार स्थापन करण्यासाठी १४५ संख्याबळ लागतं. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही १०० आमदारही नव्हतो. त्यांचे १५ आमदार घेऊन आम्ही सरकार बनवू शकतो का?”
“लोकं किती वेड्यासारखा आरोप करतात. या राजकारण्यांवर मला किव येते. मी फार मोठा पुढारी नाही, एक सामान्य कार्यकर्ता आहे. परंतु १५ आमदार काय, त्यावेळी २५ आमदार आले असते तरी हे सरकार बनलं नसतं. ५० आमदार आले असते तर त्यावेळी सरकारचा विचार झाला असता,” अशी माहिती सत्तार यांनी दिली.
हेही वाचा : आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा!
“त्यावेळची परिस्थिती मला चांगली आठवते. आम्ही शिवसेनेला सरकार स्थापन करण्याबाबत विनंती केली होती. मात्र, त्यावेळी एकनाथ शिंदे, अर्जून खोतकर आणि त्यांचे नेते यांनी ते मान्य केलं नाही. मात्र, काँग्रेसकडे तेव्हा एकनाथ शिंदेंचा असा कोणताही प्रस्ताव नव्हता,” असंही त्यांनी नमूद केलं.