माजी आमदार अभिजीत अडसूळ यांचा आरोप

अमरावती लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या पराभवामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप आनंदराव यांचे पुत्र आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षांची पैशांच्या व्यवहाराबद्दलची ध्वनिफित ‘व्हायरल’झाली होती. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक मतदानाच्या वेळी बेपत्ता होते, असेही अभिजीत अडसूळ यांचे म्हणणे आहे.

अभिजीत अडसूळ यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिवसेनेच्या पराभवाचे खापर भाजपवर फोडले. आनंदराव अडसूळ हे बुलढाण्यातून तीन वेळा आणि अमरावतीतून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांचा पराभव हा शिवसेनेसाठी अत्यंत धक्कादायक आहे. निवडणुकीच्या काळात भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या दोन ध्वनिफिती ‘व्हायरल’ झाल्या होत्या. त्यात एका ध्वनिफितीत विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत पाच कोटी रुपयांची बोलणी होती, तर दुसऱ्या ध्वनिफितीत शिवसैनिकाला ते धमकावताना दिसले. यात निश्चितपणे काहीतरी काळेबेरे आहे, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आनंदराव अडसूळ यांच्यासाठी प्रचारच केला नाही. अमरावती शहरात भाजपचे आमदार आणि ४४ नगरसेवक असताना अडसूळ यांचा २७ ते २८ हजार मतांचा फटका बसला. यातूनच सर्वकाही स्पष्ट होते. शिवसेनेला भाजपकडून जाणूनबुजून धक्का देण्यात आला काय, वरिष्ठ पातळीवरून काही आदेश आले होते काय, हे प्रश्न उपस्थित होतात. संशयाला वाव देणाऱ्या अनेक बाबी घडल्या आहेत. त्यामुळे अडसूळ यांच्या पराभवासाठी भाजपचे काही नेते देखील जबाबदार आहेत, असे अभिजीत अडसूळ म्हणाले.

भाष्य करणार नाही -आनंदराव अडसूळ

आनंदराव अडसूळ यांनी मतदारांचे आभार मानताना आपण रणांगण सोडून  जाणार नाही, असे स्पष्ट केले. निवडणूक काळात भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या ध्वनिफिती व्हायरल झाल्या. काही तरी घडल्याशिवाय अशा बाबी व्हायरल होत नसतात. पण, आपण यावर भाष्य करणार नाही, असे अडसूळ म्हणाले. निवडणुकीत जय-पराजय होतातच. पण, यावेळी मतदारांनी आपल्याला नाकारले नाही, तर गेल्यावेळेपेक्षा अधिक मते दिली आहेत. आपण पाच वेळा विदर्भातून निवडून आलो. सहाव्यांदा विजय मिळाला असता, तर निश्चितपणे मंत्रिपदाची संधी मिळाली असती, ती हुकली, असे अडसूळ म्हणाले. पराभव झाला असला, तरी रणांगणातून पळ काढणाऱ्यांपैकी आपण नाही. मतमोजणीच्या दिवशी तब्येत ठिक नसल्याने आपल्याला तातडीने मुंबईला जावे लागले, कारण तपासणी करणारे डॉक्टर हे दुसऱ्या दिवशी विदेशात जाणार होते, असे अडसूळ म्हणाले. विधानसभा निवडणुकीची तयारी शिवसेनेने चालवली आहे. पक्षादेश जसा होईल, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. नवनीत राणा यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राविषयीचा लढा सुरूच राहणार आहे, कारण तो वेगळा विषय आहे. फसवणुकीचा तो प्रकार आहे, असे अडसूळ म्हणाले.

Story img Loader