बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यांवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोश्यारींनी केवळ चंगुमंगु लोकांशी तुलना करून शिवाजी महाराजांचा अपमान केला नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला, असा आरोप बिचुकलेंनी केला. तसेच २८ नोव्हेंबरला सातारा बंदची हाक दिली. ते शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.
अभिजीत बिचुकले म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चंगुमंगु लोकांशी तुलना केली. हा कोश्यारींचा नालायकपणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही.”
“शिवरायांचा तर अपमान केलाच, पण डॉ. आंबेडकरांसाठीही एकेरी भाषेचा वापर”
“एक गाणं आहे की, ‘दोनच राजे इथं जाहले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर’. कोश्यारींनी शुल्लक लोकांशी तुलना करून माझ्या शिवरायांचा तर अपमान केलाच, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठीही एकेरी भाषा वापरून अपमान केला. अशाप्रकारे दोन्ही राजांचा अपमान झाला आहे,” असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला.
“स्वयंस्फुर्तीने २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा”
अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले, “सातारा आमची राजधानी आहे. या निमित्ताने सर्व जातीधर्मातील सातारकरांना मी आवाहन करतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्या निषेधात स्वयंस्फुर्तीने २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवावा. त्या दिवशी माझा वाढदिवसही आहे. त्यामुळे आता शिवरायांची नावं घेणारे या बंदमध्ये सहभागी होतात की नाही ते बघू.”
“सातारा बंद झाला नाही, तर हा अपमान…”
“सातारा बंद झाला नाही, तर हा अपमान माझा नसेल. मी नेता किंवा सेलिब्रेटी म्हणून सांगत नाही. मी शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून, मावळा म्हणून मी सातारा बंद ठेवण्याचं आवाहन करत आहे,” असं अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा, नवनीत राणा म्हणाल्या, “राज्यपालांना हटवण्यासाठी पंतप्रधान मोदी…”
“…तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल”
“मागील काळात वासनाकांडात अडकली तरी त्यांच्यासाठी सातारा बंद झाला. आता शिवरायांचा अपमान होऊन सातारा बंद होत नसेल, तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल,” असंही बिचुकलेंनी नमूद केलं.