“भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी ‘अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोथळा काढला’ असं वक्तव्य केलं”, असा गंभीर आरोप बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. तसेच २८ नोव्हेंबरला सातारा बंदची हाक दिली. ते शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

अभिजीत बिचुकले म्हणाले, “गोपीचंद पडळकरांनी ‘अफजल खानाने शिवाजी महाराजांचा कोथळा काढला’, असं वक्तव्य केलं. त्याबाबत माझ्याकडे पुरावेही आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतलाच पाहिजे.”

व्हिडीओ पाहा :

“हा कोश्यारींचा नालायकपणा आहे”

अभिजीत बिचुकलेंनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरूनही टीका केली. ते म्हणाले, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची चंगुमंगु लोकांशी तुलना केली. हा कोश्यारींचा नालायकपणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही.”

“बाबासाहेब आंबेडकरांसाठीही एकेरी भाषा वापरून अपमान”

“एक गाणं आहे की, ‘दोनच राजे इथं जाहले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर’. कोश्यारींनी शुल्लक लोकांशी तुलना करून माझ्या शिवरायांचा तर अपमान केलाच, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठीही एकेरी भाषा वापरून अपमान केला. अशाप्रकारे दोन्ही राजांचा अपमान झाला आहे,” असा आरोप अभिजीत बिचुकले यांनी केला.

“स्वयंस्फुर्तीने २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवा”

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाले, “सातारा आमची राजधानी आहे. या निमित्ताने सर्व जातीधर्मातील सातारकरांना मी आवाहन करतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्या निषेधात स्वयंस्फुर्तीने २८ नोव्हेंबरला सातारा बंद ठेवावा. त्या दिवशी माझा वाढदिवसही आहे. त्यामुळे आता शिवरायांची नावं घेणारे या बंदमध्ये सहभागी होतात की नाही ते बघू.”

“सातारा बंद झाला नाही, तर हा अपमान माझा नसेल”

“सातारा बंद झाला नाही, तर हा अपमान माझा नसेल. मी नेता किंवा सेलिब्रेटी म्हणून सांगत नाही. मी शिवरायांचा वैचारिक वारस म्हणून, मावळा म्हणून मी सातारा बंद ठेवण्याचं आवाहन करत आहे,” असं अभिजीत बिचुकलेंनी म्हटलं.

हेही वाचा : ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”

“…तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल”

“मागील काळात वासनाकांडात अडकली तरी त्यांच्यासाठी सातारा बंद झाला. आता शिवरायांचा अपमान होऊन सातारा बंद होत नसेल, तर प्रत्येकाची कुवत आणि पात्रता कळेल,” असंही बिचुकलेंनी नमूद केलं.

Story img Loader