Who is Abhimanyu Pawar: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या आठवड्यातील दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाची सुरुवात झाल्यानंतर आज पहिल्या सत्रामध्येच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपाचे नेते अभिमन्यू पवार यांना खडेबोल सुनावले. भाजपाच्या या आमदाराने बोलण्याची संधी न मिळाल्यामुळे थेट विधानसभेच्या अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त करताना वापरलेल्या शब्दांवरुन अजित पवारांनी आक्षेप घेत सभागृहामध्ये सर्वांसमोर अभिमन्य पवार यांना ऐकवलं. अजित पवारांनी सभागृहातील शिस्तीनुसार आपल्या सडेतोड स्वभावानुसार अभिमन्य पवार यांना जवळजवळ फैलावर घेतलं. अजित पवारांनी घेतलेल्या या भूमिकेची चर्चा असतानाच अभिमन्यू पवार कोण याबद्दलही आता चर्चा सुरु झालीय. आजच्या विधानसभेतील चर्चेमुळे प्रकाशझोतात आलेले अभिमन्यू पवार कोण आणि नेमकं विधानसभेमध्ये काय घडलं जाणून घेऊयात…

घडलं काय? अभिमन्यू पवार चर्चेत का?
आज कामाकाज सुरु झाल्यानंतर विधानसभेत आपल्याला प्रश्न विचारू दिला नाही, या मुद्द्यावरून अभिमन्यू पवार यांनी संताप व्यक्त केला. आपली नाराजी व्यक्त करताना त्यांनी थेट तालिका अध्यक्षांनाच जाब विचारायला सुरुवात केल्यामुळे अजित पवारांनी त्यांना भर सभागृहामध्ये सुनावलं. “मला का बोलू दिलं नाही? मी काय वाईट केलंय तुमचं? मी सकाळी सकाळी आंघोळ करून एवढ्या सकाळी आलो. मला का बोलू दिलं नाही एवढं सांगा”, असं अभिमन्यू पवार तालिका अध्यक्षांसमोर आपली नाराजी व्यक्त करताना बोलत होते.

…अन् अजित पवारांची एन्ट्री
आपली नाराजी मांडताना अचानक अभिमन्यू पवार यांचा आवाज चढताच त्यांना समज देण्यासाठी अजित पवार उभे राहिले. “अभिमन्यू पवारांना विनंती आहे की तालिका अध्यक्षांना असं धमकावू नका. तुम्ही एकेकाळी सरकारमध्ये कामं केलं आहे. तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. तुमच्यावर अन्याय झाला असेल, पण तुम्ही वेगळी आयुधं वापरा. अशा पद्धतीने कुणालातरी धमकावणं योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.

त्यानंतर मागितली माफी
“आज सकाळी आपण सगळे जमलो आहोत. लक्षवेधी चालू आहेत. आपण आता पार पाचव्यावर (विषय) गेलो आहोत. आपण अध्यक्षांना असं बोलू नका. हे बोलणं बरोबर नाही. काही परंपरा आहेत, काही पद्धती आहेत (सभागृहाच्या)”, असं म्हणत अजित पवार हात जोडून खाली बसले. अजित पवारांनी दम दिल्यानंतर शेवटी अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

अभिमन्यू पवार आहेत तरी कोण?
अभिमन्यू पवार हे भारतीय जनता पक्षाचे औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते चौदाव्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालयमधून वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतच पूर्ण केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वैयक्तिक व्यवस्थापन विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.

फडणवीसांशी खास कनेक्शन…
२०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक होते. या कालावधीमध्ये त्यांनी विशेष कर्तव्यावर अग्रणी अधिकारी (ओएसडी), वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे एक आघाडीचे नेते अशा तिहेरी भूमिका बजावल्या.

संघामध्ये केलं आहे काम
अभिमन्यू यांचा जन्म १ जुलै १९७१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांनी वनवासी कल्याण आश्रम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक म्हणुन सुमारे १५ वर्षे पूर्ण-वेळ काम केले. २०१० मध्ये त्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी पुरस्कार मिळाला. तेथून ते संघामध्ये दाखल झाले. अभिमन्यू पवार यांनी लातूर जिल्ह्यात रेल्वेच्या डब्यांची बांधणी करणाऱ्या कारखानाच्या बांधकामासाठी रेल्वे मंत्रालयाकडून (भारत) स्विकृती मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

आरोग्य शिबीर आणि गरजूंना मदत
अभिमन्यू यांनी त्यांचे सहकारी आणि लातूर जिल्हा प्रशासनासह सर्वप्रथम लातूर येथे महाअटल आरोग्य शिबीर यशस्वीरित्या आयोजित केले. वैद्यकीय क्षेत्रातील २५० हून अधिक तज्ज्ञांनी हजारो लोकांचा निशुल्क उपचार केला. त्यांनी लातूर जिल्ह्यातील हजारो गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत केली आहे.

Story img Loader