सिंधुदुर्गातील सार्वजनिक आरोग्याच्या दुरवस्थेसंदर्भात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने राज्यपाल के. शंकरनारायणन यांना पत्र पाठवून लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्य़ातील काही तालुक्यांतील रुग्णवाहिकेचा प्रश्न, मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या रुग्णांवर जिल्हय़ात न होणारे उपचार, जिल्हय़ातील वैद्यकीय अधिकाऱ्याची महत्त्वाची रिक्त असलेली ३५ व कर्मचाऱ्यांची ११३ रिक्त पदे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीची समस्या, वैद्यकीय सुविधांचे खासगीकरण आणि या पाश्र्वभूमीवर अपुरी यंत्रणा, मनुष्यबळाअभावी रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे होणारे हाल, याबाबत राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे अभिनव फाऊंडेशनच्या वतीने लक्ष वेधण्यात आले. जिल्हय़ातील विविध सामाजिक संस्था, संघटनांनी वेगवेगळ्या तालुक्यात यासंबंधीच्या प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सुधारणा दिसून आलेली नाही. अजूनही अत्यवस्थ रुग्णांना बांबुळी-गोवा, कोल्हापूर किंवा बेळगाव येथील रुग्णालयात पाठविण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. बऱ्याच वेळा या प्रवासात गंभीर जखमींचा जीव अक्षरश: टांगणीला लागतो. जिल्ह्य़ातील क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही, हत्तीरोग व मलेरियाच्या रुग्णांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जिल्हय़ात ३५ क्षयरोगाचे रुग्ण, ९२ कुष्ठरोगाचे रुग्ण मार्च २०१२ पर्यंत सापडले आहेत. मलेरियाचे २२३ रुग्ण सापडले आहेत. यासंबंधी गांभीर्याने विचार होऊन संबंधितांना योग्य ते आदेश दय़ावेत, अशी मागणी अभिनवच्या वतीने राज्यपाल शंकरनारायणन यांच्याकडे करण्यात आली आहे.

Story img Loader