ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची ८ फेब्रुवारी रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयात हत्येचा थरार घडला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज घोसाळकर दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी ते बाहेर फिरायला जाणार होते. परंतु, त्याआधीच काळाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर घाला घातला आणि त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर-दरेकर एकट्या पडल्या. आज व्हॅलेटाईन दिनानिमित्त त्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याच फेसबुक पेजवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीला त्यांनी अधुरी एक कहाणी हे गाणंही जोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे वॉर्ड क्रमांक ७ चे नगरसेवक होते. त्यांची पत्नी तेजस्विनी घोसाळकर याही वॉर्ड क्रमांक १ मधून नगरसेवक राहिल्या आहेत. दोघेही राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. तेजस्विनी घोसाळकर या अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असत. प्रत्येक कार्यात दोघेही जोडीने काम करत, असं तेथील स्थानिक सांगतात. तसंच, हे जोडपं राजकारणात असलं तरीही कुटुंबवत्सल होते.

हेही वाचा >> Photo : जनतेमध्ये रमणारं घोसाळकर दाम्पत्य; व्हॅलेंटाईनच्या दिवशी होता लग्नाचा वाढदिवस

अभिषेक घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर यांचा व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजे आजच लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्या दिनाच्या निमित्ताने तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या फेसबूक वॉलवर एक स्टोरी शेअर केली आहे. “स्वर्गात असलेल्या माझ्या प्रिय नवऱ्यासाठी. मला तुमच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचं होतं. परंतु, आता मला समजलं की तुम्हीच तुमचं संपूर्ण आयुष्य माझ्याबरोबर घालवणार आहात. मला माहितेय की तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलंत आणि आता पुन्हा भेटेपर्यंत तुम्ही वरूनही माझ्यावर असेच प्रेम करत राहाल. लग्नाच्या वाढदिवसाच्या स्वर्गीय शुभेच्छा. मला तुमची फार आठवण येते.

या स्टोरीमध्ये तेजस्विनी घोसाळकर यांनी अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबरचे काही खास क्षणचित्रेही शेअर केली आहेत. तसंच, अधुरी एक कहाणी…हे गाणंही या स्टोरीला जोडलं आहे.

हत्येप्रकरणी एकाला अटक

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा (४०) याला गुन्हे शाखेने अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाचा परवाना मिश्राच्या नावे असल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek ghosalkars wife tejswini ghosalkar viral post on wedding anniversery sgk