धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मंगळवारी शांततेत पार पडली. धाराशिव शहरातील भीमनगरमधील एक व नळदुर्ग येथील दोन मतदान केंद्रांवर मतदान यंत्राचा तांत्रिक बिघाड वगळता जिल्ह्यातील अन्य कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मागील तीन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र पहायला मिळाले. मतदारसंघात अंदाजे ५८ टक्के मतदान झाले आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये वाढलेला मतदानाचा टक्का यंदा मात्र घटला आहे. घटलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुढील २७ दिवस सगळ्या उमेदवारांचे देव आता पाण्यात राहणार आहेत.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांच्यामुळे त्यात आणखीन रंगत वाढली. प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता नोटासह मतदान यंत्रावर मतदारांसमोर एकूण ३० पर्याय शिल्लक होते. या दुरंगी लढतीत प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता उर्वरित ३० पर्यायांमध्ये किती मतांची विभागणी होणार, यावरही जय पराजयाचे समीकरण अवलंबून राहणार आहे. खासदार राजेनिंबाळकर यांनी त्यांच्या मूळ गावी गोवर्धनवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी तालुक्यातील तेर या त्यांच्या मूळ गावी पती आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि मुलांसह मतदान केले.
आणखी वाचा-इस्लामपूरजवळ साखराळेत युती-आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
दरम्यान सन २०१९ च्या लोकसभेसाठी १८ लाख ८६ हजार २३८ मतदारांपैकी ११ लाख ९६ हजार १६६ मतदारांनी २ हजार १२७ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये लोकसभेसाठी ६४.४१ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानात ०.९९ टक्के घट झाली असली, तरी २०१९ मध्ये मतदारसंख्या वाढल्याने ८० हजार १७५ इतके मतदान जास्त झाले आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पारड्यात आणि पथ्यावर पडते? यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.
उस्मानाबाद लोकसभेसाठी २००९ मध्ये ५४.४७ टक्के मतदान झाले होते. २०१४ मध्ये ६४.४१ टक्के तर २०१९ मध्ये ६३.४२ टक्के मतदान झाले. २०१४ मध्ये ११ लाख १५ हजार ९९१ इतके मतदान झाले असून २०१९ मध्ये ११ लाख ९६ हजार १६६ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ च्या तुलनेत ८० हजार १७५ इतके मतदान जास्त झाले आहे.
आणखी वाचा-“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
सलग तीन निवडणुकांत झालेल्या मतदानाची टक्केवारी
विधानसभा मतदारसंघ | २०१४ | २०१९ |
औसा | ६५.८५ | ६४.२४ |
उमरगा | ६२.८८ | ६०.४३ |
तुळजापूर | ६५.१० | ६४.७५ |
उस्मानाबाद | ६५.७२ | ६४.७९ |
परंडा | ६४.३६ | ६३.८५ |
बार्शी | ६२.४३ | ६१.९९ |
एकूण | ६४.४१ | ६३.४२ |