जाती-जमातींमधील अस्मिता उफाळून येणे ही चिंताजनक गोष्ट आहे. अशा संवेदनशील स्थितीत अल्पसंख्याक माणूस सुबुद्ध नागरिक बनवण्यासाठी हमीद दलवाई यांच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांनी येथे केले.
हमीद दलवाई इस्लामिक रीसर्च इन्स्टिटय़ूट व मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने परिवर्तनवादी समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या ३७व्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां गौसिया सुलताना डिकास्टा (गोवा) यांना प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम नगरला झाला. या वेळी भाई वैद्य बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे, हमीद दलवाई यांच्या पत्नी तथा संस्थेच्या मेहरुन्निसा दलवाई या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्रसेवा दल यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भाई वैद्य म्हणाले, भ्रष्टाचारी व्यक्तींना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणारा एकमेव मंत्री अशीच हमीद दलवाई यांची ख्याती होती. भ्रष्टाचाराच्या विरोधात आता बरेच बोलले जाते, मात्र दलवाई यांनी पूर्वीच त्याविरोधात लढाई सुरू केली होती. देशाच्या धर्मनिरपेक्षतेलाही आता आव्हान दिले जाते, ती संपली तर देशाचे काय होईल याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
शिंदे यांनी समाजास आधुनिक बनवताना महिलांना समान न्याय्य हक्क देणे गरजेचे आहे असे सांगितले. ते म्हणाले, मुस्लिमांमध्ये शिक्षणाचा अभाव, मागासलेपणा व महिलांवर अन्याय होत असताना दलवाई यांनी केलेला त्याग व दिलेला लढा महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा विचार जागवला जातो ही गोष्ट समाजाच्या दृष्टीने आशादायक आहे असे ते म्हणाले.
सत्कारमूर्ती गौसिया डिकास्टा या मूळच्या कल्याणच्या व २००७ पर्यंत आफ्रिकेत वास्तव्यास होत्या. फारसे शिक्षण नव्हते, शिवाय आंतरधर्मीय विवाह. पतीच्या निधनानंतर त्यांना भारतात यावे लागले. अशा स्थितीत कोणाचाच आधार नसताना त्यांनी मडगाव येतील वृद्धाश्रमातून समाजकामाला प्रारंभ केला. तशातच शिक्षण पूर्ण करून आता त्या या कार्यात अग्रभागी आहेत. संस्थेचे सचिव राजेंद्र बहाळकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
नगरचे प्रयोजन…
मेहरुन्निसा दलवाई यांनी हा कार्यक्रम नगरला घेण्याचे प्रयोजन सांगितले. त्या म्हणाल्या, देशभर गाजलेल्या शाहबानो प्रकरणात नगरला आमच्यावर हल्ला झाला होता. त्या वेळी आम्हाला रातोरात पुण्याला जावे लागले होते. म्हणूनच संस्थेचा हा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम नगरलाच घेण्यात आला.

Story img Loader