राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या आठवड्यात ‘वंदे मातरम’वरून मोठा गदारोळ झाला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी आम्हाला वंदे मातरम म्हणता येत नाही असं वक्तव्य केल्यामुळे भाजपा आणि शिंदे गटातील आमदार आक्रमक झाले होते. दुसऱ्या बाजूला ‘वंदे मातरम’ हे धार्मिक गीत नाही तर देशगीत आहे. त्यामुळे आझमींची ही भावना अयोग्य आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. दरम्यान, अबू आझमी यांच्यामुळे विधानसभेच्या अधिवेशनात आज पुन्हा एकदा गदारोळ झाला.
काश्मीर आणि काश्मिरी पंडितांबद्दल बोलताना अबू आझमी म्हणाले, कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडितांची हत्या झाली. आझमी यांचं हे वाक्य ऐकल्यावर पुन्हा एकदा भाजपा आमदार आक्रमक झाले. भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि अबू आझमी यांच्यात यावरून वाद सुरू झाला. तसेच, अबू आझमी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनीसुद्धा आक्षेप घेतला होता.
अतुल भातखळकर म्हणाले, एका व्यक्तीचा मृत्यू झाला तरी ती एक व्यक्तीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. फक्त ८९ म्हणजे काय? अध्यक्षांच्या माध्यमातून मी त्यांना (अबू आझमी) विचारतोय, या सदनात भाषण करण्यापूर्वी वंदे मातरम म्हणणार की नाही? आधी सांगा वंदे मातरम म्हणणार की नाही? आणि मगच बोला! आरएसएसचा उल्लेख का करता तुम्ही? तुम्हाला या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरे हे आता तमाशातले…”, गोपीचंद पडळकरांची खालच्या पातळीवर टीका
सभागृहातील या वादाचा व्हिडीओ आमदार अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे की, मावा आघाडीचे (महाविकास आघाडीचे) सरकार असताना अबू आझमी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसला होता. पण बहुधा सरकार बदलले आहे, याचा त्याला विसर पडला असावा. कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडीतांची हत्या झाली असे निलाजरे विधान केल्यानंतर सभागृहात त्याला जाम हाणला.