लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या आमदार अबू आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करत सांगलीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मंगळवारी निषेध करण्यात आला. तसेच आझमी यांची आमदारकी रद्द करण्याची आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. मिरज शहरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आ. आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.

समाजवादी पक्षाचे आमदार आझमी यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सांगली, मिरज शहरात उमटले. सांगलीत हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझमी यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

या वेळी शिंदे म्हणाले, ‘आमदार अबू आझमी याने यापूर्वी वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणणार नाही अशी वक्तव्ये विधिमंडळात केलेली आहेत आणि आता क्रूरकर्मा औरंगजेबाचा उदोउदो केला आहे. अशा या देशद्रोही वृत्तीच्या अबू आझमी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची आमदारकी राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने रद्द करावी अन्यथा या अबू आझमीला राज्यात शिवभक्त फिरू देणार नाहीत. औरंगजेबाचा उदोउदो करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान अबू आझमीने केला आहे.’

या वेळी हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष संजय जाधव, भाजपचे नेते अविनाश मोहिते, प्रसाद रिसवडे आदींचे भाषण झाले. या वेळी अबू आझमीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आझमी, औरंगजेबाच्या प्रतिमेला जोडे मारून व त्यांच्या प्रतिमेचे दहन करून निदर्शने करण्यात आली.

Story img Loader