देशातील शहरी भागात विखुरलेल्या समर्थकांना चार संघटनांच्या माध्यमातून एकत्रित आणण्याची जबाबदारी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने दंडकारण्य विशेष विभाग समितीवर सोपवली असून, याचाच एक भाग म्हणून देशभरातील समर्थकांना अबुजमाडच्या जंगलात बोलावले जात असल्याची माहिती पोलिसांनी सुरू केलेल्या तपासातून समोर आली आहे.
मध्य भारतातील जंगलात सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांना सध्या मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांंत नवे नेतृत्व तयार झालेले नाही. या चळवळीने शहरी भागात जाळे विणले असले तरी ते विखुरलेले आहे. शिवाय शहरी भागात सक्रिय असलेले तरुण जंगलात फार काळ तग धरू शकत नाहीत, हे वास्तव लक्षात आल्यानंतर नक्षलवाद्यांनी आता देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सूत्रबद्ध पद्धतीने जाळे विणण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. या चळवळीत सर्वोच्च स्थान असलेल्या केंद्रीय समितीने या कार्यक्रमाची जबाबदारी जंगली भागात सर्वात मजबूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंडकारण्य समितीवर टाकली असून, या समितीकडून सध्या शहरी भागात आजवर काम केलेल्यांना  जंगलात बोलावले जात असल्याची माहिती हेम मिश्रा व प्रशांत सांगलीकर या दोघांच्या अटकेतून समोर आली आहे. शहरी भागात सक्रिय होण्यासाठी नक्षलवाद्यांनी चार संघटनांना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. यात रिव्होलुशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट, कमेटी फॉर द रिलीज ऑफ पॉलिटीकल प्रिझनर्स, फोरम अगेन्स्ट द वॉर ऑन पिपल्स तसेच कमेटी अगेन्स्ट व्हॉयलन्स ऑन वूमन या संघटनांचा समावेश आहे. चळवळीसाठी उघडपणे काम करणाऱ्या या संघटना अस्तित्वात असल्या तरी त्यांची सक्रियता कमी झाली आहे. ही सक्रियता वाढवण्यासाठी पाहिजे ती मदत देण्याचे निर्देश केंद्रीय समितीने दंडकारण्य समितीला दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हेम मिश्रा व प्रशांत सांगलीकर या दोघांना अबुजमाडला बोलावण्यात आले होते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली.
या चार संघटनांपैकी रिव्होलुशनरी डेमोक्रॅटीक फ्रंट या संघटनेवर देशात फक्त आंध्र प्रदेशात बंदी आहे. बंदी असताना सुद्धा या संघटनेने दोन वर्षांपूर्वी देशभरातील फुटीरतावादी नेत्यांना एकत्र आणून हैदराबादमध्ये एक मेळावा घेतला होता. फोरम अगेन्स्ट द वॉर ऑन पिपल्स ही संघटना नक्षलवाद्यांच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्याचे काम करते. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना परदेशात जाण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देण्याची तयारी नक्षलवाद्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केली आहे.

प्रशांत सांगलीकर कोण?
मूळचा नाशिकचा व सध्या गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असलेला प्रशांत सांगलीकर हा नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे. उत्तराखंडमध्ये प्रशांत राही या नावाने काम करणाऱ्या या नक्षलवाद्याला दोन वर्ष तुरुंगात काढावी लागली. त्यानंतर तो फारसा सक्रिय नव्हता. त्यामुळेच त्याला अबुजमाडमध्ये बोलावण्यात आले होते.

Story img Loader