वाळू वाहतुकीमुळे मोठय़ा प्रमाणात खराब होणारे रस्ते दुरूस्त करावेत, या प्रमुख मागणीसाठी मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक यांच्या विरोधात सभ्यता सोडून शिव्यांची लाखोली वाहत आणि चिथावणी देत भाषण केले. तर दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयात पुरेसा पोलीस बंदोबस्त असूनही काही खासगी मल्लांच्या टोळीने ठाण मांडून स्वतंत्रपणे ‘कर्तव्य’ बजावल्याचे धक्कादायक चित्रही पाहावयास मिळाले. मात्र असा समांतर बंदोबस्त ठेवण्यात आल्याचा जिल्हा प्रशासनाने इन्कार केला आहे.
जिल्हाधिकारी मुंडे व आमदार कदम यांच्यात गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या संघर्षांने टोक गाठला आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने बोलावलेल्या बैठकीला अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेश जिल्हाधिकारी मुंडे यांनी शासनाच्याच परिपत्रकाचा आधार घेऊन दिला होता. त्यावरून मुंडे व आमदार कदम यांच्यात सुरू झालेला संघर्ष आता वाळू उपसा व वाहतुकीच्या मुद्यावरून वाढला आहे. वाळू वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते मोठय़ाप्रमाणात खराब झाले असून अगोदर रस्ते दुरूस्त करावेत आणि मगच वाळू वाहतूक व्हावी, अशी भूमिका घेऊन आमदार कदम हे जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. यातच मोहोळ विधानसभा मतदारसंघात तारापूर येथे वाळू उपसा करण्यावरून झालेल्या वादातून आमदार कदम यांच्या विरोधात तलाठय़ाला मारहाण केली व सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून जिल्हाधिकारी मुंडे यांच्या आदेशावरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे. तर, जिल्हाधिकारी मुंडे व इतरांविरूध्द आपण दिलेली अॅट्रासिटी कायद्याखालील फिर्याद नोंदवून घेतली नाही म्हणून आमदार कदम हे संतापले आहेत. याच मुद्यावर त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. मरिआई चौकातून निघालेल्या या मोर्चात आमदार कदम यांच्याबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम ऊर्फ काका साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजहान शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे, दलित स्वयंसेवक संघाचे नेते दिलीप देवकुळे आदींचा सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले तेव्हा बोलताना आमदार कदम यांनी जिल्हाधिकारी मुंडे व पोलीस अधीक्षक मंडलिक यांच्या विरोधात सभ्यता सोडून चिथावणीखोर वक्तव्य केले.या दोन्ही अधिकाऱ्यांचे कारनामे आपण राज्य विधिमंडळात उघडे पाडू, त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे जमविलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यास शासनाला भाग पाडू, असा इशारा देताना आमदार कदम यांनी वाळू वाहतूक पोलीस बंदोबस्तात होणार असेल तर गावकऱ्यांनी हातात दंडुके व पायातील चपला घेऊन पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना पळवून लावावे, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. रस्ते दुरूस्त न करता वाळू वाहतूक करणे म्हणजे वाळू माफियांना साथ दिल्यासारखे आहे. यात जिल्हाधिकारी मुंडे व पोलीस अधीक्षक मंडलिक हे गुंतले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी बळीराम साठे, दिलीप देवकुळे, मुबीना मुलाणी, महेश पवार आदींनी वाळू वाहतूक व खराब रस्त्यांच्या मुद्यावर आक्रमक भूमिका मांडली.
आमदार रमेश कदम यांनी जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा अंदाज घेऊन मोर्चाप्रसंगी पोलिसांचा बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात तैनात करण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांना भेटायला गेले तेव्हा त्यांच्या दालनात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांनी प्रत्येकाची शारीरिक तपासणी केली. त्याठिकाणी इतर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांची यंत्रणा एकीकडे पुरेशाप्रमाणात तैनात असताना दुसरीकडे जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर खासगी तरूण मल्लांची टोळी थांबून होती. पोलीस यंत्रणा कार्यरत असूनही ही खासगी मल्लांची टोळी ‘समांतर व्यवस्थे’प्रमाणे ‘कर्तव्य’ बजावत होती. त्यासाठी कर्मचारी संघटनेच्या एका नेत्याने पुढाकार घेतला होता, असे समजते. कायद्याचा अंमल चालणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयातील हे चित्र धक्कादायक होते. खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या चित्रीकरणात ही बाब प्रकाशात आली. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांचे लक्ष वेधले असता त्यांनी नकारात्मक उत्तर दिले. मल्लांची फळी स्वतंत्रपणे रक्षणासाठी आल्याचे आपणास माहीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा