लोकसत्ता वार्ताहर
राहाता : शेतीच्या बांधावरून वाद झाले, तेव्हा दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्याबद्दल सौंदाळा ग्रामपंचायतने दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर एकमेकांना शिव्या देणाऱ्या दोघांनीही शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला.
नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावात नुकताच झालेल्या ग्रामसभा ठराव अन्वये शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्यात यावा त्यानुसार एकमेकांना शिविगाळ करणार्या सदर दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले. सौंदाळा गावचा शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्याचा ठराव सोशल मिडिया व वर्तमान पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह देशात प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतने केलेल्या दंडास महत्व प्राप्त झाल आहे. सौंदाळा गावातील शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे यांचे शेतीच्या बांधावरून वाद झाले. तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या. सकाळी सरपंच शरद आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल – उभे करण्याचे सांगून वाद मिटवला.
यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतचा ५०० रुपये दंड भरला. ग्रामपंचायतने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून यापुढे शिव्या देऊन स्त्री देहाचा अपमान न करण्याचा सल्ला देऊन बांधभाऊ म्हणून गोडीगुलाबीने राहण्याचे सांगितले. दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचे ठकाजी व शांताराम यांनी म्हंटले आहे. यावेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधित भरणार असून सदरच्या रकमेतून शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे, म्हणून फ्लेक्स बोर्ड लावणार असल्याचे सांगितले.