रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते, आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)तर्फे सोमवारी सातव्यांदा चौकशी करण्यात आली. राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांनाही या चौकशीसाठी ‘एसीबी’ने नोटीस बजावली असल्याने तेही यावेळी उपस्थित होते.
नाचणे रस्त्यावरील ‘एसीबी’च्या कार्यालयात साळवी आल्याचे समजताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास तेथे मोठया संख्येने जमून जोरदार घोषणाबाजी केली. माजी नगराध्यक्ष बंडया साळवी, राजू महाडीक, प्रमोद शेरे इत्यादी नेतेमंडळीही त्यामध्ये सहभागी झाली.
हेही वाचा >>> मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून राज्यभर सर्वेक्षण; १ लाख २५ हजार कर्मचारी करणार सर्वेक्षण
कारवाईला सामोरे जाण्यापूर्वी आमदार साळवी यांना जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात गोळा होऊन पाठिंबा व्यक्त केला. तेथून या कार्यकर्त्यांसह आमदार साळवी चालत एसीबीच्या कार्यालयात गेले. कोणताही गोंधळ, गडबड न करता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करून ते चौकशीला सामोरे गेले.
दुपारी दोनच्या सुमारास ‘एसीबी’ कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तेथे रस्त्यावर जमलेल्या कार्यकर्त्यांना आमदार साळवी यांनी सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्या बंधूंशी संबंधित व्यवसायाची काही माहिती मागवली आहे. ती त्यांना आम्ही आठवडाभरात देणार आहोत. या सरकारला मला अटक करायचीच आहे, मला आरोपी बनवायचेच आहे. ४० आमदारांना फोडून एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर गेले, तेव्हापासून मी त्यांच्या गटात जाणार, अशी अफवा उठवली जात आहे. पण मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी हा कोकणातील लढवय्या आमदार आहे. राजन साळवी शरण जाणार नाही, तो आपल्यासोबत येत नाही, म्हणून सरकार या कारवाया करत आहे.
हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस; ठाकरे गटाच्या याचिकेवर दोन आठवडयांनी सुनावणी
बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप
* ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या १४ वर्षांत ३ कोटी ५३ लाख रुपये बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आमदार साळवी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांची मूळ अधिकृत संपत्ती सुमारे २ कोटी ९२लाख रुपये आहे. त्यामुळे बेहिशेबी मालमत्ता ११८ टक्के असल्याचा आरोप आहे. * साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी साळवी यांनी यापूर्वी अलिबाग येथील ‘एसीबी’ कार्यालयामध्ये सहावेळा हजेरी लावली आहे. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीयसाहाय्यक यांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे.