ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची उद्या एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी होणार आहे. बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांची चौकशी असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर राजन साळवी चौकशीसाठी अलिबागच्या दिशेनं रवाना झाले आहेत.
त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येताच राजन साळवी यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक एकवटले आहेत. रत्नागिरीत काही ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. आपल्यावर झालेली कारवाई चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली आहे. मला बजावलेली नोटीस आयोग्य असून हे सर्व भारतीय जनता पार्टीचं षडयंत्र आहे, असा आरोप राजन साळवी यांनी केला आहे. याबाबतचं वृत्त ‘टीव्ही ९ मराठी’ने दिलं आहे.
हेही वाचा- शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
‘एसीबी’च्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना आमदार साळवी म्हणाले, “भारतीय जनता पार्टीत आणि शिंदे गटात जो-जो पक्षप्रवेश करतो, तो स्वच्छ होतो. पण जो नेता त्या गटात जात नाही. त्यांच्यावर ईडी, एसीबी यासारख्या तपासयंत्रणांकडून चौकशा लावल्या जातात. पण शिवसेना हे आमचं कुटुंब आहे. या कुटुंबात माझे भाऊ, मुलं आहेतच. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून नाती जोडली आहेत. माझ्यासारख्या शिवसैनिकाला ज्या पद्धतीने नोटीस बजावली आहे, त्याचा राग प्रत्येक शिवसैनिकांच्या आणि मतदाराच्या मनात आहे,” असंही साळवी म्हणाले.