रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली असून, रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़. या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ जगभर पसरला आहे.
युक्रेनमधील नागरिकांची परिस्थिती पाहून चिंता व्यक्त होत आहे. तसेच, युक्रेनमध्ये मोठ्याप्रमाणावर भारतीय विद्यार्थी व नागरिक देखील असल्याने भारत सरकारकडून देखील त्यांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे, या पार्श्वभूमीर महाराष्ट्र सरकार देखील केंद्र सरकार व परराष्ट्र विभागाच्या सातत्याने संपर्कात आहे. याबाबत राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे.
युद्ध पेटले! ४० सैनिकांसह ५० ठार; रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “ अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. सर्व जिल्हाधिका-यांनाही या संदर्भात आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच, अनेक पालकांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. माझे कार्यालय परराष्ट्र मंत्रालयाच्या कंट्रोल रूमच्या संपर्कात आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी याबाबत माझी चर्चा झाली आहे, त्यांनीही सर्व यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.”
याचबरोबर, “ युक्रेनमध्ये आपले खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. महाराष्ट्राची संख्या मोठी आहे म्हणून राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केली आहे, परराष्ट्र विभागाला विनंती केली आहे की याकडे लक्ष द्यावं. निश्चितपणे ते देखील जाणीवपूर्वक याकडे लक्ष देतीलच. याशिवाय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना दिल्या आहेत की, एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाकडून आपल्याशी संपर्क साधला गेल्यास, केंद्रीय पातळीवर देखील एक नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आलेला आहे तिथे संपर्क साधून, संबंधित विद्यार्थ्याबाबत माहिती घ्यावी. सर्वोतपरी मदतीसाठी लक्ष द्यावं. अशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. राज्य सरकार देखील त्या विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी आणण्यासाठी सतर्क आहे.” अशी देखील माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
“अहमदनगर मधील खूप विद्यार्थी युक्रेनमध्ये असल्याने, अनेकजण संपर्क साधत आहेत. राज्य शासनाने त्यादृष्टीने देखील पावलं उचलली आहेत, मी देखील संपर्कात आहे.” असंही मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
सरकारने गांभीऱ्याने घेतले आहे, युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू – गडकरी
”युक्रेन आणि रशियामध्ये असलेल्या सर्व भारतीयांना भारतात आणण्यासाठी सर्व केंद्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहे. सरकारने गांभीऱ्याने घेतले आहे, तेथील भारतीय लोकांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे, गृहमंत्री राजनाथ सिह यांच्याशी बोलणं झाले आहे, विदर्भातील मोठ्यासंख्यने विद्यार्थी आहेत. परंतु सध्या विमान जाऊन त्यांना शकत नाही. पण योग्य वेळी प्रयत्न करून त्यानं आणण्यात येईल.” अशी माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.