अलिबाग: सोशल मिडियाच्या माध्यमातून भामटयाने एका सेवानिवृत्त महिलेला तब्बल १ कोटी १२ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. अलिबागमधील एका सरकारी नोकरीतून निवृत्त झालेली महिला मोहजालात अडकली आणि आपल्या आयुष्यातील कष्टाच्या जमापूुंजीसह तब्बल १ कोटी १२ लाख रूपयांवर पाणी सोडावे लागले. आता कपाळाला हात लावून बसण्याशिवाय तिला पर्याय उरलेला नाही. त्याचे झाले असे अलिबाग येथे राहणारया एक महिला मागील वर्षी कोर्ट सुपरिटेडेंट म्हणून निवृत्त झाल्या. एक दिवस त्यांनी इंग्लंडमधून आलेली एका इसमाची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली. आधी त्या इसमाने या महिलेचा विश्वास संपादन केला. आपल्या जाळयात महिला पुरती फसली आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली.
इंग्लंडमधून तुला सरप्राईज म्हणुन गिफ्ट पाठविले असल्याचे तिला सांगण्यात आले. कस्टम ऑफीस, दिल्ली येथे आलेले गिफ्ट पार्सल सोडविण्याकरीता, गिफ्ट टॅक्स, गिफ्ट मध्ये असलेली करन्सी एक्सचेंज टॅक्स, त्याचप्रमाणे गिफ्ट पार्सल मध्ये सोने व करन्सी असुन इंडीयन रुपयामध्ये त्याची किंमत 99 लाख रुपये असल्याचे पटवून देण्यात तो यशस्वी झाला. पुढे या कारस्थानात आरोपीसोबत आणखी सहाजण जोडले गेले.गिफ्टमध्ये असलेली करन्सीची रक्कम फिर्यादी याचे खात्यात जमा करण्यासाठी या महिलेला एकुण किती पैसे भरायचे आहेत याबाबत सांगीतले.
इतकी मोठी रक्कमेची समोरुन अनोळखी माणसं मागणी करत असतानाही, या महिलेला संशय आला नाही. अलिबाग येथील बँकांमधील पेन्शन खाते, बचत खात्यातील रक्कम तसेच सोने तारण ठेवुन कर्ज काढुन तब्बल १ कोटी १२ लाख ९२ हजार ८०० इतकी रक्कम त्या इसमाच्या खात्यांमध्ये जमा केली. हा व्यवहारच बोगस होता. परंतु ही महिला जाळयात पुर्णपणे फसली असल्याने तिला भानच राहिले नव्हते.
यानंतर तिला नाही कुठले गिफ्ट मिळाले, नाही गेलेले पैसे परत मिळाले. यानंतर समोरची व्यक्ती फेसबुकवरून गायब झाली . शेवटी या महिलेले अलिबाग पोलीसात धाव घेतली आहे. पोलीसांनी भा.दं.वि.कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल लाड करीत आहेत.