रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी समितीला सूचना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर महामार्गावरील दुरुस्त्या केल्या जातील, असे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. नाशिक शहरात खासगी प्रवासी बसगाडी आणि डंपरच्या झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले की, राज्यातील महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरही असलेल्या ब्लॅक स्पॉटबाबत सूचना दिल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र समिती कार्यरत आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आहेत. त्यांनी शोधलेले ब्लॅक स्पॉट काढून टाकण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबतही विचार करावा लागेल. त्या ब्लॅक स्पॉटची तीव्रता तपासून त्यातील दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल. यासाठी समितीचा अहवाल येणे अपेक्षित असून तो आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गासह संपूर्ण महाराष्ट्रात उपाययोजना करण्यात येतील.

  धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह  शंभर टक्के एकनाथ शिंदे यांच्या ओरिजिनलह्ण शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी या विषयावर बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली आहे. माझ्यासकट भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्याकडेच राहावे, असे वाटते. शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार-खासदारांकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. राष्ट्रीयत्व आणि हिंदूत्वाचे विचार ते पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्याच  शिवसेनेला मिळेल.

‘पालर्टमेंट टू पंचायत’ शतप्रतिशत भाजप

कोकणात ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. ही निवडणूक पक्षाच्या छोटय़ा कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून पार्लमेंट टू पंचायत शतप्रतिशत भाजप, अशी भूमिका पोचवण्याचे काम केले जात आहे. सशक्त भारतासाठी भाजप सशक्त करणे, ही काळाची गरज आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत भाजपचे विचार तळात पोहोचतील तरच पारदर्शकता येईल. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत भाजपच्या विचाराची माणसे जाणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ग्रामंपचायत निवडणुकीला महत्त्व देऊन कामे सुरू आहेत, असे मंत्री चव्हाण यांनी नमूद केले.

Story img Loader