सिल्लोडजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर छोटा टेम्पो आदळून झालेल्या अपघातात सहा वऱ्हाडींचा मृत्यु झाला. सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील मोढा फाट्याजवळजवळ बुधवारच्या मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून मृत सिल्लोड तालुक्यातील आहेत. ते इतर मंडळींसोबत कन्नड तालुक्यात एका विवाह समारंभाहून ते गावी परतत होते. मृतात दोन जोडप्यांचा (पती-पत्नी) समावेश आहे.
रस्त्यात उभ्या उसाच्या ट्रॉलीवर लहान टेम्पो धडकून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू तर १४ जण जखमी झाले. मृत सर्व सिल्लोडजवळील मंगरूळ गावचे रहिवासी असून त्यात दोन सख्खे भाऊ व सख्ख्या जावांचा समावेश आहे. मृत व जखमी हे कन्नड तालुक्यातील घाटनांद्रा येथून एका लग्नाहून येत असताना सिल्लोड शहरापासून ५ किमी अंतरावरील मोढा फाट्याजवळ बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास हा अपघात घडला.
अशोक संपत खेळवणे (वय.५२), लक्ष्मीबाई अशोक खेळवणे (४५), संजय संपत खेळवणे (४२), रंजनाबाई संजय खेळवणे (४०), जिजाबाई गणपत खेळवणे (६०), संगीता रतन खेळवणे (३५), अशी मृतांची नावे आहेत. तर कासाबाई भास्कर खेळवणे (४०), सार्थक आजीनाथ खेळवणे (८), आजीनाथ शेषराव खेळवणे (४४), गणेश सुखदेव बोरडे (१९), आकाश रमेश बोरडे (१८), ऋषिकेश गोविंदराव आरके (२०), संतोष गणपत खेळवणे (३०), धुळाबाई नारायण बोरडे (५०), दुर्गाबाई दत्तात्रय खेळवणे (४५), ओमकार रतन खेळवणे (१६), सुभाष राजेश खेळवणे (४५), सुलोचना आत्माराम खेळवणे (५५), सुरेश विठ्ठल खेळवणे (५० सर्व रा.मंगरूळ) कलाबाई बाबू म्हस्के (४०, रा.अनवी, ता.सिल्लोड), अशी जखमींची नावे आहे. ६ मृतदेहांवर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले, तर काही जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात तर काहींना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.
जखमींपैकी काहींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यात उभ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर पिकअप व्हॅन क्रमांक MH.२०.CT.२९८१ आदळून मोठा अपघात घडला. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की पीकअप वाहनाचे दोन तुकडे होऊन वाहनाचे काही भाग इतरत्र विखरुन पडले.
घटनेची माहिती मिळताच महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह मंगरूळ येथे पाठविण्याची व्यवस्था केली. यावेळी रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम म्हेत्रे उपस्थित होते.