सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावर साताऱ्यातील शिरवळ गावच्या हद्दीत वारकऱ्यांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या टेम्पोतून कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील ४३ वारकरी आळंदीला जात होते. या अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, ३० जण गंभीर जखमी, तर ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
रविवारी (१९ जून) पहाटेच्या सुमारास शिरवळच्या पुणे थांब्या जवळील परीसरात हा अपघात झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील ४३ वारकरी आळंदीकडे ट्रॅक्टर ट्रॉलीतून निघाले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॉली उलटून एका वारकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले.
सर्व जखमींवर शिरवळ व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्या आले. त्यानंतर गंभीर जखमी रुग्णांना सातारा येथील नाना पाटील रुग्णालयात दाखल केले आहे. मय्यप्पा कोंडीबा माने (वय ४५ भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारुती भैरवनाथ कोळी (वय ४०, लाहोटी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा : VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरवळ व खंडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील युवकांनीही जखमींना मदत केली. जखमींची प्रकृती स्थिर असून एक जण गंभीर आहे. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.