नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक गाडीमधील नववधूसह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२१ फेब्रुवारी) सायं. ६ वाजताच्या सुमारास भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी भोकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत.

नेमकं काय घडलं?

२ दिवसांपूर्वी विवाह झाल्यानंतर मांडव परतणीसाठी नववधूसह वऱ्हाडी जात होते. मात्र, सोमवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर टाटा मॅजिक आणि विटा वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला. टेम्पो हिमायतनगरकडून नांदेडकडे जात होता, तर टाटा मॅजिक धर्माबाद तालुक्यातील जारिकोट येथून नववधूसह तिचा भाऊ व अन्य नातेवाईक उमरखेडकडे (जि. यवतमाळ) निघाले होते.

अपघातात कुणाचा मृत्यू?

या अपघातात नववधूसह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पूजा ज्ञानेश्वर पामलवार (२१, रा. साखरा (नवरी ), दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (वय २२, नवरीचा भाऊ), माधव पुरबाजी सोपेवाड (३०, रा. जांबगाव ता. उमरी), चालक सुनील दिगांबर धोटे (२८, रा. चालगणी ता. उमरखेड) आणि इतर दोन अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे.

नागेश साहेबराव कन्नेवार (२८, रा. जारीकोट), अविनाश संतोष वंकलवाड (रा. तामसा), अभिनंदन मधुकर कसबे (१६, रा. वाजेगाव), सुनिता अविनाश तोपलवारसह (३५, रा. तामसा) काही अनोळखी व्यक्ती जखमी झाले आहेत.

हेही वाचा : VIDEO: थेट किराणा दुकानात घुसली कार, दुकानदार थोडक्यात बचावले, नाशिकमधील घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

दरम्यान, जखमींना नांदेडच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले. घटनास्थळी एसडीपीओनी भेट दिली असून वाहतूक सुरळीत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी दिली.