धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील चिंचगव्हाण फाटय़ावर गुरुवारी दुपारी दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरची समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात १९ ठार, तर ३५ जण जखमी झाले. पोलीस यंत्रणेच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा १९ असला तरी राज्य परिवहन महामंडळाने ही संख्या २२ असल्याचे म्हटले आहे. मृतांमध्ये दोन मुलांसह तीन महिलांचा समावेश आहे.
कंटेनरने बसचा पत्रा अक्षरश: कापून काढला. पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना चाळीसगाव, धुळ्यासह परिसरातील रुग्णालयांमध्ये दाखल केले. चाळीसगाव-सुरत ही बस गुरुवारी दुपारी धुळ्याकडे जात असताना चाळीसगावपासून काही अंतरावर असलेल्या चिंचगव्हाण फाटय़ाजवळ अचानक कंटेनर येऊन आदळला. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनरची बसला धडक बसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. बालाजी वेफर्स कंपनीचा हा कंटेनर असून त्याने बसची उजवी बाजू अक्षरश: कापून काढल्याने १८ प्रवासी जागीच ठार झाले. कंटेनरमधील तीन जण आणि दुचाकीस्वार ठार झाल्याची माहिती चाळीसगावचे आगार व्यवस्थापक सागर झोरगे यांनी दिली. पोलीस उपअधीक्षक संदीप जाधव यांनी अपघातात १९ जण ठार झाल्याचे सांगितले. अपघातातील मृतांमध्ये शांताराम महाजन (५०), मथुराबाई महाजन (३५, दोघेही रा. कचगाव), आशा वनसिंग गायकवाड (३५, चाळीसगाव), पांगू सोनवणे (४०, उंबरखेड), उत्तम पवार (५५), बापू राठोड (५५, खेर्डे, सोनगाव), बुधा कोठोडे (८ खैरव, बुलढाणा), विनोद दार्देकर (३०), कैलास दार्देकर (दोघेही चाळीसगाव) यांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना तुषार पाखले (२०, चाळीसगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. उर्वरित मृतांची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नव्हती.
अपघातानंतर काही वेळातच चाळीसगाव आणि मेहुणबारे ठाण्यातील पोलिसांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. पोलिसांना बसचा पत्रा कापून मृत व जखमींना बाहेर काढावे लागले. जखमींना मिळेल त्या वाहनाने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींची संख्या अधिक असल्याने रुग्णालयात धावपळ उडाली.

दुभाजक नसल्याने अपघात
चाळीसगाव-धुळे महामार्गावर दुभाजक नसल्याने याआधीही अनेकदा अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ दुभाजक व गतिरोधकासाठी वारंवार आंदोलने करतात. ही व्यवस्था होत नसल्याने पुन:पुन्हा अपघात होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

Story img Loader