समाजातील परिचित व्यक्तीच्या निधनानंतर स्मशानभूमीतून राख सावडून अंबाजोगाईकडे जात असलेल्या प्रवासी रिक्षाला एका भरधाव कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तीन प्रवासी, अशा चौघांचा मृत्यू झाला. ही घटना केज-अंबाजोगाई रस्त्यावरील होळ गावाजवळ गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान घडली.
या अपघातात मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके, प्रिया दीपकसिंग गोके, वीरसिंग दीपकसिंग गोके (रा. केज) आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (रा. पिसेगाव) यांचा मृत्यू झाला. तर हरजितसिंग बादलसिंग टाक, चंदाबाई बादलसिंग टाक, मालासिंग दुर्गासिंग (रा. जालना) आणि दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, गोविंदसिंग मच्छिंद्रसिंग गोके (रा. केज) हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.
केज येथील शिकलकरी समाजातील नागरिक हे त्यांच्या समाजातील चरणसिंग गोके यांच्या अंत्यविधीनंतरचे विधी आटोपून सायंकाळी अंबाजोगाईकडे रिक्षाने जात होते. अपघातस्थळी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे आणि त्यांच्या टीमने भेट देऊन अपघातग्रस्तांना रुग्णालयात पाठविले. उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शरद झाडके, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी या अपघातानंतर घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली.