पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटारीवर आदळून एक जण ठार झाला तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र मंगळसूत्र गेलेली महिला तक्रार देण्यासाठी पोलिसात आलीच नाही .
मांढरदेव येथे काळूबाई येथून येऊन दावजीबुवा मंदिरातून (सुरूर, ता. वाई ) येथून दर्शन घेऊन पुण्याकडे जाण्यासाठी एक महिला एस टी बसची वाट पाहत उभी होती. दरम्यान, सातारा बाजूकडून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र ओढून पुणे बाजूकडे पोबारा केला. महिलेच्या आरडाओरडय़ामुळे परिसरातील लोक जमा झाले व त्यांनी या दुचाकीचा पाठलाग सुरू केला. एक मोटार आपला पाठलाग करत आहे हे लक्षात आल्यावर वेळे ( ता. वाई) येथे हातातील तुटके मंगळसूत्र पाठलाग करणाऱ्या गाडीवर टाकून चोरटे चुकीच्या मार्गाने खंबाटकी घाटातून पुण्याकडे पसार झाले. खंबाटकी घाटातील समोरून येणारी वाहने चुकविण्याच्या प्रयत्नात असताना घाटाच्या शेवटच्या वळणावर समोरून येणाऱ्या मोटारीवर जाऊन आदळले. यात दुचाकीचालक स्वप्निल मोहन गागडे (वय २२,रा. नीरा, ता. पुरंदर, तर रुपेश सुरेंद्र कांबळे (वय २६, रा. नीरा, ता. पुरंदर, सध्या रा. इचलकरंजी) हे जखमी झाले. जखमी रुपेश कांबळेने स्वनिल गागडेला याला शिरवळ येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भुईज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी रुपेश कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र ज्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटय़ांनी लांबविले, ती महिलाच तक्रार देण्यासाठी भुईज पोलिसात हजर झाली नाही तिला शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मंगळसूत्र चोराचा अपघाती मृत्यू
पुणे बेंगलोर मार्गावर एस टी बससाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून पळून खंबाटकी घाटातून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटारीवर आदळून एक जण ठार झाला तर दुसऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
First published on: 03-08-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidental death of mangalsutra theft