पालघरमधील वैतरणा रेल्वे पूल क्रमांक ९२ वर रविवारी सकाळच्या सुमारास वाढीव गावातील रहिवासी असलेल्या प्रीतम रवींद्र पाटील (वय-२५) या तरुणाचा रेल्वे अपघाताने मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून वाढीव गावातील रहिवाशांना वैतरणा नदी ओलांडण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जी धोक्यात घालून रेल्वे पूल ओलांडावा लागतो. तर, रेल्वे रुळावर झालेल्या अपघात मृत्यू झाल्याची तीन महिन्यातली ही पाचवी घटना आहे.

प्रीतम याची प्रकृती ठीक नसल्याने तो रविवार सकाळी वैतरणा येथील रुग्णालयातून उपचार घेऊन वाढीव येथे परतत होता. वैतरणा रेल्वे पूल क्रमांक ९२ वरून तो चालत असताना अचानक दोन्ही बाजूने रेल्वे आल्याने तो घाबरला जीव वाचवण्याचा पर्यायच न उरल्याने त्याचा मुंबईकडे भरधाव जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसखाली सकाळच्या सुमारास त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा वाढीव गाव शोककळा पसरली आहे. शिवया वाढीव ग्रामस्थांमध्ये प्रशासनविरोधात तीव्र संताप आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आणखी एक बळी गेल्याचा आरोप होत आहे.

प्रीतम हा शेती व मत्स्यव्यवसाय करून कुटुंबाची गुजराण करीत होता. त्याचे आई-वडील व लहान भावाची त्याच्यावर जबाबदारी होती. पर्यायी पादचारी पूल नसल्यामुळे अनेक वर्षांपासून वाढीव ग्रामस्थांना वैतरणा रेल्वेपुलावरून खडतर प्रवास करावा लागत आहे. वाढीव हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. चहुबाजूंनी पाण्याने वेढलेल्या गावच्या अनेक समस्या आहेत. यातील एक मुख्य समस्या म्हणजे येथील ग्रामस्थाना गावाबाहेर येण्याजाण्यासाठी वैतरणा खाडीवरील रेल्वेचा पूल अर्थात रेल्वेमार्ग हा एकमेव पादचारी मार्ग उपलब्ध आहे. वर्षानुवर्षे ग्रामस्थ याच मार्गाचा अवलंब करत आहेत. या रेल्वे मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा अंदाज घेऊन हे ग्रामस्थ हा प्रवास करत असतात. मात्र या धोकादायक मार्गाने आजवर गावातील शाळकरी मुलांसह महिला, पुरुष आदींचा बळी घेतला आहे. त्यातच या मार्गावर अनेक ठिकाणी चालण्यास योग्य जागा नसल्याने हा मार्ग अधिकच धोकादायक बनलेला आहे.

गावकऱ्यांच्या समस्यांची दखल घेण्याऐवजी अशाप्रकारच्या अपघाताचे खापर आपल्या विभागावर फोडले जाईल, ही भीती बाळगून रेल्वे प्रशासनान काही दिवसांपूर्वीच मार्गच बंद करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदने देण्यात आली. त्याअनुषंगाने प्रशासन म्हणून येथे पर्यायी पादचारी पूल बांधण्यात येईल, असे सांगण्यात आले असले तरी तो अद्याप बांधण्यात आलेला नाही. परिणामी पर्यायी पादचारी मार्ग नसल्यामुळे आजही नागरिक या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत आहेत.

पादचारी पूल नसल्याने प्रीतम पाटील या तरुणाचा रविवारी बळी गेला.आणखी किती बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी प्रशासनाला केला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार तथा जिल्हा प्रशासनाने तातडीने या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पर्यायी सोय करावी अशी मागणी पुन्हा एकदा पुढे येऊ लागली आहे.

अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार –
वाढीव गावातील नागरिकाचा तीन महिन्यातील हा पाचवा अपघाती मृत्यू आहे. हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. पादचारी पुलासाठी आमची अनेक वर्षाची मागणी आहे. एका कुटुंबाचा पोषणकर्ता गेल्याने प्रशासनाविरोधात संपूर्ण गावात असंतोष आहे. मागणी तातडीने पूर्ण न झाल्यास नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पावित्र्यात आहेत. – महेश पाटील, नागरिक, वाढीव

Story img Loader