यंदाच्या उन्हाळी मोसमात मुंबई- गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून दोन वेगवेगळ्या अपघातांत २ ठार व २४ प्रवासी जखमी झाले आहेत.
महामार्गावरील चिपळूण-संगमेश्वर रस्त्यावर आगवे येथे खासगी आराम बस उलटून झालेल्या अपघातात रामिरो रामाल्डो डिसूझा (७२, मुंबई) ठार झाले तर १५ जण जखमी झाले. याच ट्रॅव्हल कंपनीच्या बसला गेल्या १९ मार्च रोजी खेडजवळ जगबुडी नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात ३७ जण ठार झाले होते. या वळणावर गेल्या आठवडाभरात झालेला हा दुसरा अपघात आहे. या दुर्घटनेपाठोपाठ हातखंबा पोलीस मदत केंद्राजवळ मॅक्स आणि ट्रॅव्हल कंपनीच्या गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात मॅक्सचा चालक राकेश वाघाटे याचा मृत्यू ओढवला, तर ९ जण जखमी झाले.
आगवे येथील अवघड वळणावर गेल्या २५ मे रोजी मुंबईहून राजापूरला निघालेली खासगी आराम बस उलटून ३ जण ठार व २२ प्रवासी जखमी झाले होते. त्यापूर्वी दोनच दिवस (२२ मे) रायगड जिल्ह्यात माणगावजवळ खासगी बसला झालेल्या अपघातात ३ प्रवासी ठार झाले होते.
गणेशोत्सव, शिमगा, उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात येण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बस या दोन्ही ठिकाणी आगाऊ आरक्षण मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या बसचा आधार घेतात. यापैकी बहुसंख्य कंपन्यांकडून बसगाडय़ांची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे केली जात नाही. धंद्याचा हंगाम असल्यामुळे चालकाची प्रकृती किंवा अनुभवीपणा तपासून न घेता या बसगाडय़ांवर नियुक्ती केली जाते. त्यांना पुरेशा विश्रांतीचीही काळजी घेतली जात नाही. त्यातूनच खासगी आराम गाडय़ांचे अपघात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र संबंधित ट्रॅव्हल कंपन्यांवर याबाबत दबाव टाकून आवश्यक काळजीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. त्याचप्रमाणे अनेकजण खासगी किंवा भाडोत्री वाहनांनी प्रवास करतात. या गाडय़ांचे चालक कोकणातील वळणदार रस्त्यांना सरावलेले नसतात. त्यातूनही अनेक अपघात या महामार्गावर झालेले दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा