ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि राज्यभरातील इतर सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यूप्रमाण वाढल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अपुरा औषध साठा यांमुळे रुग्णांचे हाल होत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडवर आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात आरोग्यव्यवस्थेतील सुधारात्मक उपाययोजनेबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली होती. ही बैठक नुकतीच संपली असून त्यांनी या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
२५ सिव्हिल रुग्णालय उभारणार
रुग्णांची संख्या आणि आपल्याकडे असलेल्या सुविधा, हॉस्पिटल, बेड आणि क्षमता यावर चर्चा झाली. मेडिकल कॉलेजला सिव्हिल हॉस्पिटल अटॅच केले आहेत, सिव्हिल हॉस्पिटल पुन्हा सार्वजनिक आरोग्य विभागाकडे देण्याचे निर्णय आहेत, यामध्ये होणारे विलंब, त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन राज्यात २५ ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय उभारण्याची चर्चा झाली, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दोन यंत्रणा उभारणार
आरोग्य विभागासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. रुग्णांची ओपीडी, दाखल रुग्ण, रुग्णालयाची क्षमता यावर आज सविस्तर चर्चा झाली. दोन यंत्रणा उभ्या राहिल्या तर महाराष्ट्रात रुग्णांची सेवा कमी होणार नाही. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभं करण्याकरताही आज चर्चा झाली. एका रुग्णालयात गेल्यानंतर संपूर्ण उपचार रुग्णाला मिळायला हवेत यावरही आज चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकसंख्येनुसार आरोग्य सुविधेत वाढ करणार
केंद्र सरकारनेही आरोग्य यंत्रणेसाठी मदत होईल असा निर्णय घेतला आहे. लोकसंख्येनुसार आरोग्य सुविधेत अमुलाग्र वाढ आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यातही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे आता चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आठशे आपला दवाखाना सुरू करणार
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना दीड लाखांची होती, त्याची मर्यादा वाढवून पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता सर्वांना घेता येणार आहे. तसंच, दोन कोटी हेल्थ कार्ड देण्याचा प्रयत्न असणार आहे. याचा फायदा रुग्णांना होणार आहे. आठशे ठिकाणी आपला दवाखाना सुरू होणार आहेत. आतापर्यंत साडेतीनशे रुग्णालय सुरू झाली असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.
औषध खरेदी आणि रिक्त पदांची भरती करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार, सर्व जिल्हाधिकारी आता रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. रुग्णालयांच्या नियमित भेट देऊन औषध पुरवठा, मॅन पॉवर, पिण्याचे पाणी, स्वच्छता, या सगळ्याकडे बारकाईने लक्ष दिलं जाईल. यामुळे औषधांचा तुटवडा भासणार नाही. तसंच, मेडिसिनचं ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग केलं जाईल. कोणत्या रुग्णालयात किती औषधे उपलब्ध आहेत, याची माहिती मंत्रालयातही उपलब्ध असणार आहे, असं ते म्हणाले.