Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे अवघ्या राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी सुदर्शन घुलेसह तीनजण भिवंडीत आले होते. ज्या लोकांना ते भेटायला गेले होते, त्यांनी आता माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहे. नोकरीच्या शोधात ते भिवंडीत आल्याची माहिती समोर येत आहे.
भिवंडीतील सामाजिक कार्यकर्ते असलेले सोन्या पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात समाजसेवा करत आहे. माझा सचिव विक्रम डोईफोडे हा बीडचा आहे. आमचं बीडमध्ये चांगलं काम आहे. बीडहून काही माणसं आम्हाला भेटायला आले तेव्हा माझा सचिव हजर नव्हता. भाऊ होता. भावाकडे माझी चौकशी करून ते निघून गेले. त्यानंतर बीडमधून गुन्हे शाखेचे अधिकारी आले. त्यांनीही आमची चौकशी केली. कार्यालयात एकच जण आला होता. आम्ही भेटणार नाही, असं म्हटल्यावर ते निघून गेले. जे आले होते त्याचा फोटो काढला होता, तो फोटो अधिकाऱ्यांना दाखवला.” सोन्या पाटील टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आम्ही त्याला ओळखत नव्हतो
सोन्या पाटील यांचा भाऊ जयवंत पाटील यांनीही यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सोन्या पाटील यांना भेटायला एक व्यक्ती आला होता. त्या व्यक्तीला आम्ही ओळखत नव्हतो. त्याचं आडनाव घुले असल्याचं कळलं. तो कार्यालयात आला. त्याने आमचा सचिव विक्रम डोईफोडे याला विचारलं. मी तेवढ्यात त्याचा फोटो काढला आणि विक्रम डोईफोडे यांना पाठवला. विक्रमच्या बारमध्ये जातोय असं त्यांनी सांगितलं. तेथून ते कोठे गेले हे माहीत नाही.”
हेही वाचा >> वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
गावाकडून एक मोठं प्रकरण करून आलाय
दरम्यान, ज्या विक्रम डोईफोडेला भेटायला आले होते त्यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, १२ डिसेंबरला मुलाचा वाढदिवस असल्याने आम्ही ८ डिसेंबर रोजी वैष्णवदेवीला गेलो होते. १० तारखेला दर्शन घेऊन खाली आलो. माझा मोबाईल तिथे बंद होता. तिथून गोल्डन टेम्पलसाठी आम्ही निघालो. जम्मू क्रॉस केल्यावर माझा फोन चालू झाल्याने मला मेसेज येऊ लागले. त्यावेळी एक फोटो आला होता. माझ्या गावाकडचे पाहुणे आल्याचं सांगून फोटो पाठले गेले. मी फोन करून सांगितलं की हा वॉन्टेड मुलगा आहे. तो आपल्याकडे का आला? गावाकडचं एक मोठं प्रकरण करून आला आहे, असं मला सांगण्यात आलं. पण मी सांगितलं की माझ्याकडे अशा लोकांना थारा नाही. तो वॉशरूमला जाऊन येतो म्हणाला आणि परत आलाच नाही.”