अकोले: जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एके काळी गाजलेल्या सुगाव (ता. अकोले, जि. नगर) महिला हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सुगाव खुर्द येथे काल, रविवारी रात्री घडली.
मच्छीन्द्र उर्फ अण्णा मुक्ताजी वैद्य (वय ५८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या अण्णा वैद्य याच्या घराच्या परिसरात काही वर्षांपूर्वी तीन महिलांचे पुरलेले सांगाडे आढळले होते. सुगावचे हे महिला हत्याकांड तेव्हा राज्यात चांगलेच गाजले होते.
मात्र सबळ पुराव्याअभावी त्याची या सर्व गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात तो अनेक वर्षे कारागृहात होता. सुटून आल्यानंतर तो एकटाच सुगावमध्ये रहात होता. त्याची गावात मोठी दहशत होती. त्याने काल गावातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढली तसेच तिच्या घरात घुसून त्या मुलीला बेदम मारहाण केली. मुलीला सोडवू पाहणाऱ्या महिलांनाही दमदाटी केली. या घटनेनेने संतप्त झालेल्या गावातील काही जणांच्या जमावाने नंतर त्याला घरातून ओढत बाहेर काढले व बेदम मारहाण केली.
गंभीर स्थितीत त्याला उपचारासाठी अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याची स्थिती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथे पाठविण्यात आले. मात्र उपचार होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्याकडून घोषित करण्यात आले.