परभणी : एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला वीस वर्षाची सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले. आज गुरुवारी (दि. 6) जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एफ. एम. खान यांनी हा निकाल दिला. याबाबत अधिक माहिती अशी की येथून जवळच असलेल्या दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2023 यावर्षी या प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणातील आरोपी स्वप्निल उर्फ राजू भगवान ताकट याने मोबाईल देऊन लहान मुलीला बाथरूममध्ये नेत अश्लील चाळे केले.

यावेळी मुलीची आजी आली असता आरोपी काहीच न बोलता निघून गेला. आजीने मुलीला घरी आणले त्यावेळी मुलीने सर्व परिस्थिती सांगितली. ती रडत होती. त्यानंतर मुलीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी टिप्पलवाड यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले.

पीडिता, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वाची ठरली. न्यायालयाने आरोपी स्वप्निल उर्फ राजू ताकट याला दहा वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड व आणखी एका कलमाखाली वीस वर्षे सक्तमजुरी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी अभियोक्ता ॲड. ज्ञानोबा दराडे, सहाय्यक संचालक सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुनंदा चावरे यांनी बाजू मांडली.

Story img Loader