सोलापूर : खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून एक महिना संचित रजेवर (पॕरोल) सुटलेला सोलापूरचा शिक्षाबंदी नंतर कारागृहात पुढील शिक्षा भोगण्यासाठी हजर न होता तब्बल १७ वर्षे फरारी होता. परंतु अखेर उशिरा का होईना, तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यास अटक करून पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. फरारी असताना त्याने लग्नही केल्याचे आढळून आले.
विकास हरी जाधव (रा. शिवाजीनगर, केगाव, ता. उत्तर सोलापूर) असे या शिक्षाबंदी कैद्याचे नाव आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २००० साली झालेल्या खून प्रकरणात सोलापूरच्या सत्र न्यायालयाने विकास जाधव यास ३१ जानेवारी २००२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे शिक्षाबंदी म्हणून त्याची रवानगी कोल्हापूरच्या कळंब मध्यवर्ती कारागृहात झाली होती. दरम्यान, तो पुढे ४ एप्रिल २००६ रोजी एक महिन्यासाठी वचन रजेवर (पॕरोल) सुटला होता. रजा संपल्यानंतर ५ मे २००६ रोजी पुढील शिक्षा भोगण्यासाठी तो कारागृहात हजर होणे बंधनकारक होते. परंतु पुढील शिक्षा भोगावी लागू नये म्हणून तो कारागृहात हजर न होता फरारी झाला होता. त्याबद्दल फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनाही तो सापडत नव्हता.
हेही वाचा >>>“बाबासाहेब पुरंदरेंना विरोध केला, तेव्हा सुनील तटकरेंनी मला…”, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
सोलापूर जिल्हा आणि शेजारच्या धाराशिवमध्ये तो स्वतःची ओळख लपवून फिरत होता. फरारी असताना त्याने लग्नही केले होते. दरम्यान, विकास जाधव हा सोलापुरात जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील एका लाॕजसमोर थांबला असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक फौजदार दिलीप किर्दक, पोलीस शिपाई भारत पाटील आदींच्या पथकाने त्यास पकडले.