धाराशिव: पाच वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीस फूस लावून तिला पळवून नेत तिच्यावर दुष्कर्म करणार्‍या आरोपी हकीम काझी यास धाराशिव येथील विशेष सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी १० वर्षे सक्तमजुरी व २१ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनेच्या दोन वर्षापूर्वीपासून आरोपी हकीम काझी व पीडितेचे कुटुंब एकत्र ऊसतोड कामगार म्हणून विविध ठिकाणी काम करीत होते. दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेस तिच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ऊसतोडीचे काम संपल्यानंतर आरोपीने पीडितेस व तिच्या आईस एका बांधकाम मिस्त्रीकडे मजूर म्हणून काम मिळवून दिले. घटनेच्या दिवशी ७ मे २०१९ रोजी पीडित मुलगी ही एकटी बांधकामाच्या कामावर जात असताना आरोपी हकीम काझी याने ‘आज बांधकामावर काम नाही, दुसरीकडे काम आहे’, असे म्हणून त्याच्या अपसिंगा येथील शेतात घेऊन गेला. त्यानंतर तिथून बसने हुमनाबाद येथे पीडितेला घेऊन गेला. तेथे गेल्यानंतर ‘येथे माझ्या ओळखीचे खूप लोक आहेत’, असे म्हणून तिला बुरखा घालण्यास दिला. तेथून जहीराबाद येथे घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने पीडितेस आरोपीच्या लहान मुलासोबत रूमवर २६ मे २०१९ रोजीपर्यंत ठेवले. त्या दरम्यानच्या काळात आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

पीडित मुलगी ७ मे २०१९ रोजी कामावरून परत न आल्याने तिच्या पालकांनी  तिचा शोध घेतला. परंतु ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर त्यांनी बांधकाम मिस्त्रीकडून माहिती मिळाल्याने पीडितेच्या आईने आरोपी हकीम मेहबूब काझी  (रा. रामनगर, सांजा रोड, धाराशिव) यांच्याविरुद्ध तिच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेले म्हणून तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध आनंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. व्ही. सिद्धे व एस. जी. भुजबळ यांनी पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी तत्कालीक विशेष न्यायाधीश एस. डी. जगताप व विशेष न्यायाधीश टी.जी. मिटकरी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. प्रकरणात आरोपीविरुद्ध दोषसिद्धीसाठी सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणातील पीडितेची नैसर्गिक साक्ष, मुख्याध्यापकाची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी हा विवाहीत असुन त्यास तीन मुले असतानाही अल्पवयीन पिडीतेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेले साक्षीदार व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष सत्र न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी आरोपी हकीम मेहबूब काझी एकूण १० वर्षे सक्तमजुरी व २१  हजार रूपयांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.