माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थिनींना शिक्षकाकडून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील कडूस येथील ग्रामस्थांनी गुरुवारी शाळा तसेच सर्व व्यवहार बंद ठेवून घटनेचा निषेध केला. दरम्यान, आरोपी शिक्षक सुनील गायकवाड यास सुपे पोलिसांनी शिरूर (जिल्हा पुणे) येथून सकाळी अटक केली. त्यास पारनेरच्या न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आरोपी गायकवाड याने जामीनअर्ज सादर करून लगेच आपली सुटका करून घेतली.
कुरुंद येथील शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात बुधवारी सुनील गायकवाड या शिक्षकाने आठवीत शिकणाऱ्या अकरा विद्यार्थिनींना बुधवारी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत सर्व विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. त्यापैकी तिघींना जास्त मार लागल्याने त्यांच्यावर नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारा केल्यानंतर त्यांना बुधवारी रात्रीच घरी सोडण्यात आले. मात्र या तिघींनाही गुरुवारी सकाळी पुन्हा त्रास होऊ लागल्याने पळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर पुन्हा उपचार करण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कडूस येथील ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून या घटनेचा निषेध केला व गावासह शाळाही बंद ठेवण्यात आली होती.

Story img Loader