बनावट नावांनी जामीन मिळवून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणात दोषी ठरलेला जामीनदार राजेश किशनराव दाभाडे (रा. जालना) याला विविध कलमांखाली ५ वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. डी. गुरनुले यांनी गुरुवारी सुनावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणात मुख्य न्यायदंडाधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक नितीन राजेश मराठे (४९) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मराठे हे ३ जून २०२१ रोजी कर्तव्यावर हजर राहून दैनंदिन कामकाज करत असताना सिडको पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी मोबीन अजीज शेख याचा जामीन घेण्यासाठी वकिलामार्फत राजेंद्र हरबक (रा. चापडगाव ता. घनसावंगी) याच्या नावे असलेला पी. आर मुद्रांकशुल्क व इतर दस्तावेज सादर करण्यात आले होते. त्या वेळी कागदपत्रांवरील छायाचित्रावरून संबंधित व्यक्तीने यापूर्वीही जामीन घेतलेला असल्याची मराठे यांना शंका आली. त्यांनी तपास केला असता, आरोपीने २१ मे २०२१ रोजी मुकुंदवादी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी इम्रान अली रशिद अली या आरोपीचा वकिलामार्फत भागुजी पालवे (रा. करडगाव, ता. घनसावंगी) याच्या नावे जामीन घेतल्याचे समोर आले. दोन्ही प्रकरणांत नावे वेगवेगळी असून, छायाचित्र मात्र एकच असल्याचे उघडकीस आले. ही बाब मराठे यांनी वरिष्ठांना कळवली. तेव्हा न्यायालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली. प्रकरणात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यात तपास अधिकारी राहुल भादर्गे यांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक सरकारी वकील आनंद पाईकराव आणि जे. आय. परकोटे यांनी साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी राजेश दाभाडे याला दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.