संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोप सिद्ध झाले असून कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. कोर्ट उद्या आरोपीला शिक्षा सुनावणार असल्याची माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. आज या खटल्याचा निकाल येणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सुनावणीकडे लागलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपीला ११.३० वाजता चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आले आहे. आता या खटल्याचा निकाल उद्या गुरुवारी १० फेब्रुवारीला येणार असल्याची माहिती सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

३ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपी विकेश नगराळेनं एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटवलं होतं. १० फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वांकडून होत होती. पोलिसांकडून याप्रकरणी ४२६ पानांचं दोषारोपपत्र, ६४ सुनावणी आणि २९ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित तरुणीच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण होत असून तिच्या स्मृतीदिनीच कोर्ट शिक्षेची सुनावणी करणार आहे.

नक्की काय घडलं हिंगणघाटमध्ये?

हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४० टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.

कोण आहे आरोपी?

आरोपीचे नाव विकेश नगराळे असं आहे. आरोपीचे लग्न झाले असून त्याला मुलगी आहे. नुकताच तो रेल्वेत नोकरीला लागल्याचं सांगण्यात आलं होतं. तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused who burnt woman lecturer found guilty by court hinganghat sgy