अमरावती : येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युसूफ खान बहादूर खान याचे उमेश कोल्हे यांच्यासोबत १६ वर्षांपासून व्यावसायिक आणि मैत्रीचे संबंध होते. पण, नूपुर शर्माचे समर्थन करणारी प्रतिक्रिया कोल्हे यांनी युसूफ खानच्या व्हॉट्सअॅप समूहावर पाठवताच रागातून युसूफ खानने ही माहिती इतरांना दिली आणि त्याचवेळी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला गेला, अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.
युसूफ खान हा पशुवैद्यक असल्याने त्याची सहव्यवसायी उमेश कोल्हे यांच्यासोबत २००६ मध्ये ओळख झाली. तो कोल्हे यांच्या दुकानात यायचा. घरगुती कार्यक्रमांमध्येही सहभागी व्हायचा. कोल्हे यांचे युसूफकडे दीड लाख रुपये उधारही होते. कोल्हे यांच्या व्यावसायिक प्रगतीमुळे युसूफच्या मनात असूया निर्माण झाली आणि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा आला. पण दोघेही ‘ब्लॅक फ्रिडम’ या व्हॉट्सअॅप समूहाचे सदस्य होते. याच समूहावर कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारी प्रतिक्रिया पाठवली. युसूफने रागातून या प्रतिक्रियेचे ‘स्क्रीन शॉट’ काढले आणि दुसऱ्या समूहांमध्ये पाठवले. पोलिसांनी चिथावणी देणारा म्हणून युसूफ खानला अटक केली.
मूख्य सूत्रधार शेख इरफान हा ‘रहबर हेल्पलाईन’ ही स्वयंसेवी संस्था चालवतो, त्याने कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला. मुदस्सीर अहमद हा आरोपी भाजी विक्रेता आहे. तौफिक ऊर्फ नानू तसेच शोएब खान हे दोघे वेिल्डगचे काम करतात. शाहरुख पठाण हा टाईल्स बसवण्याचे काम करतो, तर अतिब रशीदचा दुग्धव्यवसाय आहे. तौफिक आणि मुख्य सूत्रधार इरफान यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल असले, तरी इतर पाच आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपींनी कोल्हे यांच्यावर तीन दिवस पाळत ठेवली आणि संधी मिळताच २१ जूनला अंधाऱ्या गल्लीत त्यांची गळय़ावर चाकूने वार करून हत्या केली, शहरातून पळून जाण्यासाठी शेख इरफानने आरोपींना दहा हजार रुपये व एक वाहन उपलब्ध करून दिल्याचेही पोलीस तपासात समोर आले.
‘रहबर’ या संस्थेची पाच वर्षांपूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाली आहे. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) हत्येचा तपास सोपवण्यात आला असून सातही आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींचा विविध संघटनांशी आणि आंतरराष्ट्रीय संबंध याची देखील चौकशी केली जात आहे.
पोलिसांवरील आरोप आकसातून- आरती सिंह
हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला नाही. विषय संवेदनशील असल्याने जोपर्यंत ठोस पुरावे प्राप्त झाले नाहीत, तोपर्यंत हत्येचा हेतू जाहीर केला नाही. यासंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे आहेत. या हत्येच्या प्रकरणात लुटीचे कोणतेही कलम नोंदवण्यात आलेले नाही. महापालिका आयुक्तांवरील हल्ला प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या विरोधात ३०७ कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यापासून आपल्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत, असे पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांचे म्हणणे आहे.