मोहन अटाळकर
अमरावती : परतवाडा येथे ईदच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकावर आक्षेपार्ह गाणे वाजविल्याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली असली तरी या घटनेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
गेल्या एप्रिल महिन्यात अचलपूर येथे उफाळून आलेल्या जातीय संघर्षांचे निखारे विझलेले नसताना आता पुन्हा नव्याने वाद उभा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. परतवाडा येथील महावीर चौकात हे आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले होते. सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य करताना दोन समाजांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचलपूर-परतवाडा हे जुळे शहर जातीयदृष्टय़ा संवेदनशील मानले जाते. अचलपुरातील दुल्हा दरवाजावर झेंडा लावण्याच्या वादातून दोन समुदायातील नागरिकांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना गेल्या एप्रिलमध्ये घडली होती. पोलिसांनी वेळीच उपाययोजना केल्याने दंगलीची स्थिती निर्माण होऊ शकली नाही, पण हे जुळे शहर धगधगते ठेवण्याचे प्रयत्न काही घटकांकडून केले जात आहेत का, असा सवाल केला जात आहे. एखाद्या समुदायाची एक आक्षेपार्ह कृती ही दुसऱ्या समुदायाचे माथे भडकवणारी ठरते आणि संघर्ष उभा राहतो. यात दोन्ही समुदायातील पुढाऱ्यांनी समन्वय, सामंजस्याची भूमिका घेणे अपेक्षित असते, पण त्याचा अभाव गेल्या काही महिन्यांतील घटनांमधून दिसून आला आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या घटनेवर अद्याप प्रतिक्रिया आली नसली, तरी भाजपच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. ईदनिमित्ताने परतवाडय़ात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या. ही कोणती मानसिकता आहे? मिरवणूक काढायला विरोध नाही, मात्र कोणाचा जीव घ्यावा या मानिकतेचा आम्ही विरोध करतो. या मिरवणूक सहभागी झालेले अनेक जण पीएफआयशी संबंधित आहेत. यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली. दुसरीकडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून हिंदू-मुस्लीम दंगल भडकावून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे. अशाच पद्धतीचा आक्षेप भाजपवरही घेण्यात आला आहे. अमरावतीत उसळलेल्या दंगलीनंतर भाजपने पद्धतशीररीत्या प्रचार यंत्रणा राबवून हिंदू मतांचे ध्रुवीकरण चालवल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. परस्परांवर आरोप केले. जात असताना अचलपूर-परतवाडा हे कायम तणावाच्या सावटाखाली असू नये, याची काळजी धुरीणांचा घ्यावी लागणार आहे. आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणावाचे मुद्दे उकरून काढले जातील आणि त्याचा फायदा राजकीयदृष्टय़ा पदरात पाडून घेण्यासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न केले जातील, असे आता उघडपणे बोलले जात आहे.