Bachchu Kadu : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. तसेच महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसताना दिसत आहे, तर महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने आहे. पुढच्या काही तासांमध्ये निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यानंतर राज्यात नेमकी कोणाचं सरकार येणार? महाविकास घाडीला किती जागा मिळाल्या? हे स्पष्ट होईल. मात्र, आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.
आमदार बच्चू कडू यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार प्रविण तायडे विजयी झाले आहेत. दरम्यान, आमदार बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून राज्यातील विविध मतदारसंघात उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देणारे आणि शिवसेना शिंदे गटाच्या बरोबर गुवाहाटीला जाणारे आमदार बच्चू कडू यांचाच मोठ्या मताधिक्यांनी पराभव झाला आहे.
हेही वाचा : महायुती मोठ्या विजयाच्या दिशेने, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लाडक्या बहिणी…”
दरम्यान, अचलपूर विधानसभा मतदारसंघातून (Achalpur Vidhan Sabha Election 2024) महायुतीकडून प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीकडून बाबलुभाऊ देशमुख हे निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र, या निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांना पराभव झाल्यामुळे प्रहारला मोठा धक्का बसला आहे.
निकालाआधी बच्चू कडू काय म्हणाले होते?
“आम्हाला महायुती आणि महाविकासआघाडीचे फोन आले आहेत. मात्र, कोणाचा फोन आला हे आत्ता सांगायला नको. उद्या (२३ नोव्हेंबर ) निकालानंतर सर्व काही स्पष्ट होईल. फोन आले असले तरी आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. कारण अखेर आमचे निवडणुकीतील मुद्दे महत्वाचे आहेत. आम्ही सरकार स्थापन करू. यामध्ये काही अपक्ष असतील आणि काही लहान पक्षांचा समावेश असेल”, असं बच्चू कडू यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं होतं.